मुंबई, 11 जून, तुषार रुपनवार : नेतेमंडळी दौऱ्यावर निघाले की अनेकदा नेत्यांसोबत त्यांचा लवाजमा पहायला मिळतो. त्यामध्ये सुरक्षा रक्षक, पीए व त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असतो. त्यामुळे अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो. मात्र राज्यातील एक मंत्री याला अपवाद ठरत आहेत. ते म्हणजे भाजपचे संकटमोचक आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असे ओळख असलेले गिरीश महाजन. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी कोणताही लवाजमा व सुरक्षा न घेता नुकताच मुंबई ते नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वेनं एकट्यानं प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे त्यांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासून एकटाच प्रवास करत असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिरिक्त सुरक्षा नाकारली महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी ही अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली. याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय प्लस सुरक्षा नाकारली आहे. प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की पुन्हा प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. यामुळे नागरीकांनाही त्रास होतो, त्यांची गैरसोय होते. पोलिस दलावरही भार वाढतो, म्हणून गेली 30 वर्ष आमदार होतो तेव्हाही आणी मंत्री झालो तेव्हापण एकट्यानंच प्रवास करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.