मुंबई 19 मार्च : बातमीचं हेडिंग वाचूनच तुमची उत्सुकता शिगेला पोहोचली असेल. त्याचं झालं असं, की गेल्यावर्षी कोरोना (CoronaVirus) महामारीनं जगभर थैमान घातलं आणि आता पुन्हा दुसरी लाट येण्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्याचा फटका जसा मोठमोठ्या उद्योगांना बसला तसाच शेतात दिवसरात्र घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांनाही (Corona Effect On Farmers) बसला आहे. त्या कोविडच्या फटक्यानंतर जरा कुठे व्यवहार सुरळीत होतात तोच दुसरं एक आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलं. फळांचं उत्पादन अधिक प्रमाणात झाल्यामुळे बाजारात फळांची मोठी आवक झाली. त्यामुळे आपोआपच फळांचे भाव पडले. कोरोनाचा फटका आणि हे नवं आव्हान! पण हार मानेल तो बळीराजा कसला? यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी एक शक्कल लढवली आणि फ्रुटकेक (Fresh Fruit Cake) चळवळ सुरू झाली .
काय आहे ही चळवळ?
सध्या वाढदिवस, लग्नवाढदिवस इतर काही आनंदाचे प्रसंग हे केक कापून साजरा करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्यामुळे अगदी निमशहरी भागांतही केक शॉप दिसतात. त्याच धर्तीवर फळ उत्पादक शेतकऱ्यांनी मैद्याचा किंवा रव्याचा केक घेण्याऐवजी आमच्या शेतातल्या ताज्या कलिंगड, टरबूज, द्राक्षं, केळी, संत्रा, अनननस या फळांपासून तयार केलेला फ्रुट केक कापा आणि कार्यक्रम साजरा करा असं आवाहन करायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा सगळ्या फळ उत्पादक शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या घरातल्या कार्यक्रमांत हे केक कापायला सुरुवात केली आणि याचा फायदा फळविक्रीला झाला. त्यातूनच निर्माण झाली फ्रुट केक चळवळ. आता हे शेतकरी स्वत: फ्रुट केकच वापरतात त्याचबरोबर इतरांनाही सांगतात. त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही तसं आवाहन केलं जातंय आणि त्याला नेटकरी उत्तम प्रतिसाद देत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रात पसरत आहे चळवळ
ही चळवळ आता जरी सुप्त स्वरूपात असली तरीही ती हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत असून, कुठे स्वयंसेवी संस्था फ्रुट केक तयार करण्याची ऑनलाईन स्पर्धा आयोजित करत आहेत तर कुठे फ्रुट केक शॉपी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झालेत. पुण्यातील शेती विषयाचे तज्ज्ञ दीपक चव्हाण म्हणाले,‘ कोविड आणि जास्तीचं उत्पादन याचा दुहेरी फटका बसल्याने महाराष्ट्रातला शेतकरी नाराज झाला नाही. त्याने त्यावरही उपाय शोधला. त्यांनी एक नामी युक्ती शोधली आणि सोशल मीडियातून फ्रुट केक विकत घेण्याचं आवाहन केलं. तुमचे वाढदिवस, लग्न वाढदिवस आणि इतर कार्यक्रमांना हे फ्रुट केक वापरा अशी जाहिरात त्यांनी सोशल मीडियावरून केली. यामुळे शेतकऱ्यांची फळं विकली जाऊ लागलीच पण दुसराही फायदा होऊ लागला.
सामान्यपणे शेतकरी जे फळ पिकवतो ते तोच आरोग्याला हितकारक असूनही अधिक प्रमाणात खात नाही. त्याच्या कुटुंबालाही ते खायला मिळत नाही. पण या चळवळीमुळे निदान फळ उत्पादक शेतकरी तरी त्यांच्या घरच्या समारंभांत फ्रुट केक खाऊ लागले आहेत. बेकरीतील केकच्या तुलनेत हा केक नक्कीच आरोग्यदायी आहे. सध्या जरी ही चळवळ शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत मर्यादित असली तरीही ती लवकरच फोफावेल आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी या माध्यमातून नक्कीच एक चांगला पर्याय उपलब्ध होईल असा मला विश्वास वाटतो.’
फ्रुट केक तयार करण्याची ऑनलाईन स्पर्धा
‘होय आम्ही शेतकरी’ या शेतकऱ्यांच्या संघटनेने फ्रेश फ्रुट केक तयार करण्याची एक स्पर्धा आयोजित केली आहे. त्याबद्दल या संघटनेचे सदस्य सांगलीचे अमोल पाटील म्हणाले, ‘आम्ही फ्रेश फ्रुट केक तयार करण्याची ऑनलाईन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धक आपल्या घरीच फ्रुट केक तयार करून त्याचे फोटो आणि व्हिडिओ आमच्या सोशल मीडिया पेजवर पाठवू शकतात. त्यातील सर्वोत्तम फ्रुट केकची निवड करून त्याला बक्षीस देण्यात येईल. सध्या शेतकरी आणि इतरांनी केलेल्या फ्रुट केकच्या फोटो व्हिडिओंनी आमचं सोशल मीडिया पेज भरून गेलं आहे. आतापर्यंत 150 जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. या संकल्पनेला व्यावसायिक स्वरूप दिलं जाणं गरजेचं आहे.’
अमरावतीत होणार फ्रुट केक शॉपी
अमरावतीतील भाजी बाजार या स्टार्टअपचे संचालक महेंद्र टेकाडे म्हणाले, ‘ फ्रुट केक चळवळीला सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे आम्ही अमरावतीमध्ये फ्रुट केक शॉपी सुरू करण्याच्या विचारात आहोत. आता आम्ही ग्राहकांना घरपोच भाजीपाला पुरवतो त्यामुळे आमच्याकडे पुरवठा साखळी आहेच त्याचाच फायदा आम्हाला या शॉपीसाठी होईल. हे केक अधिक आकर्षक करण्यासाठी आम्ही प्रोफेशनलची मदत घेत आहोत. लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी मिकी माऊस, बार्बी डॉलच्या आकाराचे फ्रुट केक तयार करण्याचा आमचा विचार आहे.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Covid-19, Creativity, Farmer, Lockdown, Maharashtra, Wedding cake, World After Corona