पुणे, 26 फेब्रुवारी : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले यांच्यासह गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री चौघांना अटक केली. या प्रकरणी भोसले यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बँकेत ७१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवण्यात आला असून गैरव्यवहाराची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. बँकेचे संचालक अनिल भोसले यांच्यासह एस. व्ही. जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी पडवळ, बँकेचे अधिकारी शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. भोसले यांच्यासह अटक करण्यात आलेल्या चौघांनाही बुधवारी दुपारी शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनिल भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या ठेवीदारांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आर्थिक बेशिस्तीमुळे या बँकेतील सामान्य ठेवीदारांचे तब्बल 9 कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे या ठेवीदारांनी बँकेचे संचालक तथा आमदार अनिल भोसले यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण हे आमदार भोसले सहकारमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने सहकार खातं त्यांच्यावर कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलक ठेवीदारांनी केला. पुण्यातली आणखी एक बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर शिवाजीराव भोसले बँकेने ठेवीदारांचे तब्बल 9 कोटी रुपये थकवले आहेत. बँकेच्या उरळी कांचन शाखेत ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. कुणी शेत विकून बँकेत पैसे ठेवलेत तर कुणी आयुष्याची पुंजी या बँकेत ठेवली आहे. पण आर्थिक बेशिस्तीमुळे रिझर्व बँकेने या बँकेवर कारवाई सुरू केल्याने या ठेवीदारांना त्यांचे हक्काचे पैसे मिळेनासे झाले आहेत. बँकेचे अध्यक्ष आमदार अनिल भोसलेंवर कारवाईची मागणी ठेवीदारांनी केली आहे. सहकार खात्याची मात्र, कारवाईस टाळाटाळ बँकेच्या या आर्थिक बेशिस्तीविरोधात ठेवीदारांनी सहकार खात्याकडेही तक्रार केली आहे. पण बँकेचे संचालक आणि आमदार अनिल भोसले हे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप आंदोलक विकास लवांडे यांनी केला आहे. या बँकेच्या पुणे आणि परिसरात मिळून एकूण 14 शाखा आहेत. गेल्या वर्षभरापर्यंत या बँकेचा कारभार सुरळीत सुरू होता. पण संचालकांनी बेसुमार कर्जवाटप केल्याने ही बँक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आबे. अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर, मार्च 2019 पर्यंत बँकेत 450 कोटींच्या ठेवी होत्या. बँकेमार्फत तब्बल 316 कोटींचं कर्जवाटप करण्यात आलं आहे. पण 60 टक्के कर्ज हे बुडीत खात्यात जमा ? मोठ्या खातेदारांनी पैसेे काढताच बँक अडचणीत आली आहे. सध्या बँकेकडे फक्त 375 कोटींच्या ठेवी आहेत. आर्थिक बेशिस्तीमुळे रिझर्व बँकेनं या बँकेवर अनेक निर्बंध घातले असले तरी बँकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणून ठेवणाऱ्या दोषींवर कधी कारवाई होणार याबद्दल याची विचारणा ठेवीदारांकडून केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.