यवतमाळ, 06 जून : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्याच्या ईसापुरधरण इथं एका लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याच्या भोजनातून 50 पेक्षा जास्त लोकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, यात लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार. आज ईसापुरधरण इथं दुपारी एक विवाह समारंभ होता. मोठ्या थाटात वाजत गाजत नवरदेव आपल्या वऱ्हाडासह दुपारी दाखल झालं. त्यानंतर विवाह सोहळा संपन्न झाला. दुपारी बारा वाजेच्या दरम्यान या लग्न समारंभासाठी आलेल्या मंडळीनी भोजन केले. वऱ्हाडी मंडळींनी जेवणावर ताव मारला. त्यानंतर दोन तासानंतर अचानक काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागला. एक दोन जणांना आधी त्रास जाणवत होता, त्यानंतर एकएक करून संख्या वाढत गेली. अचानक उलट्या आणि मळमळ होत असल्यामुळे एकच खळबळ उडाली. ( माजी खासदाराशी पंगा घेणं Google ला पडलं महागात; न्यायालयाने ठोठावला दंड ) त्यामुळे वऱ्हाडी मंडळीला तातडीने शेंबाळपिंपरी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतरही अनेकांना हा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शेंबाळपिंपरी येथील चंदेल रूग्णालयासह इतर रूग्णालयात 50 पेक्षा अधिक जणां रूग्णालयात दाखल करण्यात आले. ( शेतात काम करत असताना वीज कोसळली, 2 बैलांसह शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ) यात लहान मुलांसह महिलांचाही समावेश आहे. रूग्णाचे प्रमाण वाढल्याने शेंबाळपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिकेने पुसद इथं काही जणांना हलवण्यात आले. सध्या 18 रुग्णांवर पुसद येथे उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं अन्नातून कशामुळे विषबाधा झाली याचा तपास केला जात आहे. मात्र, या मंगल कार्यात अचानक घडलेल्या या घटनेमुळे वधू आणि वर मंडळीकडे एकच खळबळ उडून गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.