गुहागर, 9 ऑगस्ट: दाभोळ खाडीत मच्छिमारांची बोट बुडाल्याची घटना समोर आली आहे. अंजनवेल लाईट हाऊसच्या समोर समुद्रात ही घटना घडली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेच्या व्हिडीओ समोर आला आहे.
गुहागरमधील अंजनवेलच्या लाईट हाऊसच्या समोर खोल समुद्रात रविवारी (9 ऑगस्ट) मच्छिमारांची बोट बुडल्याची घटना घडली. या बोटीवर एकूण 8 खलाशी होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे. यातील 6 खलाशी जीवांच्या आकांताने पोहत पोहत किनारपट्टीवर आले तर उर्वरित दोघे काही काळ बुडणाऱ्या बोटीचा सहारा घेत राहिले.
हेही वाचा...LIVE VIDEO: वडापाव सेंटरमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट; 5 जण होरपळले, 3 गंभीर
सुदैवाने आजूबाजूला ठराविक अंतरावर दुसरी एक बोट असल्यामुळे बुडणाऱ्या बोटीवरील इतर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, मच्छिमारांच्या बोटीला जलसमाधी मिळाली आहे.
दाभोळ खाडीत मच्छिमारांच्या बोटीला जलसमाधी, LIVE VIDEO मध्ये पाहा थरार... pic.twitter.com/yeFxjtTddh
— News18Lokmat (@News18lokmat) August 9, 2020
सकाळी ही बोट मासेमारीसाठी समुद्रात जात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बोटीवरील खलाशी हे धोपावे गावातले रहिवासी असल्याचं समजतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुहागर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुरक्षित आलेल्या मच्छिमारांना प्राथमिक उपचार देऊन त्यांची आता चौकशी होत आहे.
हेही वाचा...शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारनं रातोरात हटवला, शिवभक्तांमध्ये संतापाची लाट
दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात अशीच थरारक घटना घडली होती. दाभोळ खाडीच्य बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीला अचानक भीषण आग लागली होती. प्रसंगावधान राखून बोटीवर असलेल्या खलाशांनी पाण्यात उड्या घेतल्यानं जीवितहानी झाली नव्हती.
दुसरीकडे, लॉकडाऊनच्या काळात काही नियमांचे पालन करून मासेमारीला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे बोटमालकांनी आपापल्या बोटी समुद्रात उतरवल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.