गुहागर, 26 नोव्हेंबर: रत्नागिरीतील जयगड बंदरातून मासेमारीसाठी गेलेली नावेद 2 ही बोट 7 खलाशांसह मासेमारीसाठी गेलेली एक महिन्यापूर्वी अचानक गायब झाली होती. या घटनेला आज एक महिना उलटून गेल्यानंतर अद्याप 6 मच्छिमारांसह संबंधित बोट बेपत्ता आहे. त्या बोटीसोबत नेमकं काय झालं याचं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांच्या जीवाला घोर लागला आहे. दुसरीकडे बेपत्ता असलेल्या खलाशांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या परतीची अपेक्षा सोडून देऊन त्यांचा अंत्यविधी देखील उरकला आहे.
नावेद 2 या मच्छिमार बोटीला जिंदाल कंपनीच्या मालवाहू जहाजाची धडक बसल्याचा संशय येथील मच्छिमारांसह स्थानिक आमदार भास्कर जाधव आणि माजी आमदार विनय नातू यांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने याची चौकशी करावी अशी मागणीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या घटनेला एक महिना उलटूनही बेपत्ता बोटीचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे तपास यंत्रणेविषयी अनेक संशय निर्माण होत आहेत. मच्छिमारांच्या म्हणण्याप्रमाणे बोटीला जर अपघात झाला असेल तर बोटीचे अवशेष तरी मिळणं अपेक्षित होतं. अगदीच काही नाही तर, बोटीवरचं काही सामान असं असतं जे पाण्यात बुडणारं नसतं. त्यामुळे ते तरी दिसायला हवं होतं.
हेही वाचा-जन्मजात बाळाला दोन डोकं, निर्दयी आईनं रुग्णालयातून काढला पळ
मात्र यातील कोणतेच अवषेश न सापडल्यामुळे हा घातपात तर नाही ना? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. जर हा घातपात असेल तर केवळ मच्छिमारच नव्हे तर हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असल्याचं स्थानिक मच्छिमारांनी म्हटलं आहे. याबाबत बोट मालक नासीर संसारे यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून या प्रकाराची चौकशी करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात पोलिसांनी जिंदाल मधून 26 ऑक्टोबरला गेलेल्या मालवाहू जहाजाच्या कॅप्टनची चौकशी केली आहे. घटनेच्या दिवशी आपल्याला बोट सदृश्य काहीतरी दिसलं असल्याची कबुली कार्गोच्या कॅप्टननं दिल्याचंही जयगड पोलिसांनी सांगितलं आहे. मात्र यापुढे झालेल्या तपासाची माहिती अद्यापतरी समोर आली नाही.
हेही वाचा-Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल
नावेद 2 ही बोट बेपत्ता झाल्यामुळे 7 जणांचे परिवार अक्षरशः उघड्यावर पडलेत. त्यातील दगडू तांडेल यांच्या घराची परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. त्यांच्या घरी पत्नी, 4 अविवाहित मुली, कॅन्सरग्रस्त विवाहित मुलगा त्याची पत्नी आणि त्यांचं 11 महिन्याचं बाळ सर्वजण निराधार झाले आहेत. दगडू यांचा सर्व संसार उघड्यावर पडला आहे. दगडू तांडेल हे साखरी आगर गावातील रहिवाशी असून जयगड येथील नासिर मियाँ संसारे यांच्या बोटीवर गेल्या 12 वर्षांपासून काम करत आहेत.
हेही वाचा-आमदाराला पाहताच चोरासारखे पळाले पोलीस; कन्नड घाटात वसुलीचा भांडाफोड, पाहा VIDEO
जिंदाल कंपनीकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही
कंपनीचे PRO आणि पोर्टवरील सिक्युरिटीच्या म्हणण्यानुसार, समुद्रात बोट सदृश्य वस्तू कार्गोच्या कॅप्टनला दिसली असल्याची कबुली दिली आहे. मात्र ती नावेद 2 हीच बोट होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे या सगळ्याचा तपास आता पोलीस करत आहेत. तर, मंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या बैठकीत खलाशांच्या वारसांना जिंदाल कंपनीच्या CSR मधून मदत करण्यासंदर्भात चर्चा झाली. पण अद्याप कंपनीकडून यावर अधिकृत भाष्य केलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Ratnagiri