जळगाव, 01 ऑगस्ट: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील बोरखेडा याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका शेतकऱ्यानं मुलगा, पत्नी आणि घरातील सर्व अन्य मंडळी झोपी गेले असता, मध्य रात्री शेतात जाऊन आत्महत्या केली आहे. तत्पूर्वी आत्महत्येची सर्व तयारी झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला आणि नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिली. यानंतर मुलासह कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली. पण नातेवाईकांना शेताच्या दिशेनं येताना पाहून संबंधित शेतकऱ्यानं गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. कैलास धनसिंग पाटील असं आत्महत्या करणाऱ्या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. ते जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवासी आहे. त्यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्याचं पाहून घराबाहेर पडले. त्यानंतर रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडून जातोय’ अशी माहिती दिली. हेही वाचा- सेम टीशर्ट घातल्यानं निष्पाप तरुणाचा गेला जीव; भयंकर कृत्यानं मुंबई हादरली साखरझोपेत असणारे हे चारही जण खडबडून जागे झाले. त्यांनी कसलाही विचार न करता, बॅटरी घेऊन काळोखातून मार्ग काढत शेताच्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान शेताच्या दिशेनं बॅटरी चमकल्याचं दिसताच पाटील यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी तातडीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. हेही वाचा- मुंबई: डोक्यावर कुटुंबाचं ओझं अन् मनात नैराश्य;20वर्षीय हतबल तरुणीनं संपवलं जीवन गळफास घेण्यापूर्वी निंबाच्या झाडावरूनच केला फोन गळफास घेण्यापूर्वी पाटील यांनी निंबाच्या झाडावर बसूनच आपल्या मुलाला, नातेवाई आणि मित्र अशा चार जणांना फोन केला होता. फोन करून त्यांनी ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिली. यानंतर घाबरलेल्या चारही जणांनी तातडीनं शेताकडे धाव घेतली. रात्रीच्या काळोखात बॅटरी चमकल्याचं दिसताच पाटील यांनी गळफास घेतला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.