मुंबई, 28 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Commission of India) देशभरातील रिक्त असलेल्या विधानसभा आणि लोकसभेच्या पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका विधानसभेच्या जागेचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर - बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा (Deglur Assembly bypolls) यामध्ये समावेश आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण तयारी केली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.
देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?
2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी
2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी
2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला
नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचा दौरा करत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
जिल्हा परिषद, पोट निवडणुकांचा कार्यक्रम
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं आहे. या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर पुढील महिन्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समीतीच्या निवडणुका पार पडणार आहेत. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान घेण्यात येणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. तसंच पालघर जिल्हा परिषदेच्या व त्या अंतर्गतच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील त्याच दिवशी मतदान होईल आणि सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.
असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम
नाम निर्देशनपत्रासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी 27 सप्टेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी 29 सप्टेंबर 2021 पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. 5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान; तर 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होईल. जिल्हा परिषदेच्या एकूण 85 निवडणूक विभाग आणि पंचायत समितीच्या एकूण 144 निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, Nanded, महाराष्ट्र