मुंबई, 17 ऑगस्ट : विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालंय. या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. विरोधकांनी विधान भवनाच्या पायरीवर उभं राहून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. विरोधकांचा आक्रमकपणा पाहता राज्य सरकारनेदेखील त्यांना जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटाच्या सर्व आमदारांना विरोधकांना जशास तसे उत्तर देण्यास सांगितलं आहे. तर आमदार संतोष बांगर यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे यांची त्यांच्या गटाच्या आमदारांसोबत आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. विरोधक अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झालेले बघायला मिळाले. त्यामुळे विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याचं या बैठकीत ठरलं. एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबतचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ( ‘50 खोके…एकदम ओक्के’ विरोधकांच्या घोषणा अन् शिंदेंची एंट्री, शंभूराजे म्हणाले, पाहिजे का? ) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत शिंदे गटाचे आमदार संतोष बागर यांच्याबद्दल देखील चर्चा झाली. संतोष बांगर यांनी नुकतंच एका व्यवस्थापकाला मारहाण केल्याचं प्रकरण ताजं आहे. तसेच त्यांनी फोनवरही एकाला दमदाटी केल्याचा प्रकार ताजा होता. त्यांच्या अशाप्रकारच्या वागणुकीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील टीका केली होती. अखेर या प्रकरणाता वाद वाढत असल्याचं पाहून एकनाथ शिंदे यांनी संतोष बांगर यांना सबुरीचा सल्ला दिल्याची माहीती सूत्रांनी दिलीय. हाणामारी ही आपली संस्कृती नाही. त्यामुळे असे प्रकार पुढे होऊ देऊ नका, असं मुख्यमंत्री बांगर यांना म्हणाले आहेत. नेमकं प्रकरण काय? हिंगोली जिल्ह्यामध्ये कामगार विभागामार्फत बांधकामांवरील कामगारांना मोफत मध्यान भोजन वाटप केले जाते. याच मध्यान भोजन योजनेतील गैरप्रकाराचा आमदार संतोष बांगर यांनी भांडाफोड केला होता. हिंगोली शहराजवळील एमआयडीसी भागात जिल्ह्यातील कामगारांसाठी एकत्रित अन्न शिजवले जाते व येथून हे अन्न जिल्हाभरातील कामगारांना दुपारच्या वेळी वितरीत केले जाते. आमदार बांगर यांना या जेवणाविषयी तक्रार आली होती. त्यामुळे आमदार बांगर यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कामगारांसाठी शिजवण्यात येणारे हे अन्न अत्यंत निकृष्ट दर्जाचे आढळून आले. बुरशीजन्य डाळी, भाज्या, करपलेल्या चपात्या व अन्न शिजवण्याच्या ठिकाणी घाण आढळून आल्याने बांगर चांगलेच संतप्त झाले. संतप्त झालेल्या आमदार संतोष बांगर यांनी व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला या प्रकाराचा जाब विचारला. पण उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदार बांगर यांनी तिथे उपस्थित व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. गरीब लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार पाहून बांगर यांनी कंत्राटदारालाही फोनवरून चांगलेच खडसावले. त्यांचा याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.