मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिंदे सरकारची धावाधाव, शिंदे, फडणवीस आणि राणे घेणार मोदींची भेट

फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिंदे सरकारची धावाधाव, शिंदे, फडणवीस आणि राणे घेणार मोदींची भेट

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 सप्टेंबर : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राजकीय आखाडा तापला आहे. या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात सध्या प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी, राज्य सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती, सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. त्यामुळे वेदांता-फॉक्सकॉन वादावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.

(मविआचा आणखी एक निर्णय रद्द, शिंदे सरकारकडून आता नव्याने होणार नियुक्ता)

दरम्यान, फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचं प्रकरण ताजं असताना रायगड जिल्ह्यातला प्रस्तावित बल्क ड्रग्ज पार्कही गुजरातमध्ये नेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. बल्क ड्रग्ज पार्क रायगडमध्ये उभारण्याचं निश्चित झालं होतं. पण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा प्रकल्प गुजरातमध्ये उभारणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. ऐनवेळी बल्क ड्रग्ज पार्क गुजरातमध्ये कसं नेण्यात आलं असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. तर विरोधकांनी आत्मपरिक्षण करावं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

First published: