जळगाव, 15 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे सध्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यातल्या एका कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी अजित पवारांसमोरच जिल्ह्यातील पक्षाच्या धोरणावर नाराजी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते घरीच असतात, पण कार्यक्रमांना बोलावलं जात नाही, अशी खंत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. नाथाभाऊचा गट वेगळा, इतरांचा गट वेगळा, अशी स्थिती राहिली तर पुढील काळात अवस्था बिकट राहील, असा धोक्याचा इशाराही एकनाथ खडसे यांनी अजित पवारांना भरसभेत दिला. एकनाथ खडसे यांनी जिल्ह्यातील पक्षाच्या समस्यांचा पाढाच अजितदादांसमोर वाचला. ओके म्हणून खोके म्हणून चालणार नाही, पक्षाने आक्रमक व्हायला पाहिजे, अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी अजित पवारांसमोर केली.
अजित पवारांसमोरच एकनाथ खडसेंची राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी, भर सभेत वाचला तक्रारींचा पाढा#AjitPawar #EknathKhadse pic.twitter.com/0A9y8tWEeB
— News18Lokmat (@News18lokmat) September 15, 2022
जळगावमधल्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा सुरू होता. मुख्य म्हणजे एकनाथ खडसे यांचं भाषण सुरू असतानाच सभागृहातले लाईट दोन वेळा गेले. लाईट गेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोबाईलच्या टॉर्च लावून घोषणाबाजी केली. एकनाथ खडसे यांनी 2020 साली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, यानंतर याच वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. विधानपरिषदेत निवडणुकीत विजय झाल्यानंतर खडसेंना मोठं मंत्रिपद मिळेल, अशीही शक्यता वर्तवली जात होती, पण खडसे आमदार झाले, मात्र विधानपरिषद निवडणुकीनंतर लगेचच राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं.