नितीन नांदुरकर, जळगाव, 20 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत असा आहे. खडसे आधी भाजपमध्ये असताना देखील त्यांच्या संघर्ष बघायला मिळाला होता. खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक आरोप केले होते. फडणवीसांमुळेच आपल्याला कोर्टकचेरीला सामोरं जावं लागल्याचं त्यांनी याआधीच बोलून दाखवलं होतं. तसेच त्यांनी भाजप सोडताना भर मंचावर फडणवीसांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. हा संघर्ष अद्यापही संपलेला नाही. एकनाथ खडसेंनी सीडी काढण्याचा इशारा दिला होता. पण सीडी काही अद्याप समोर येऊ शकलेली नाही. पण राज्यात शिंदे-फडणवीस यांचं एकत्रित सरकार आल्यानंतर खडसेंचं वर्चस्व असलेल्या जळगाव दूध संघातील त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी नाथाभाऊला आणखी किती बदनाम करणार? असा प्रश्न विचारला आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या जळगाव दूध संघाच्या अध्यक्षा होत्या. पण दूध संघात दहा कोटींचा निधी शासनाची परवानगी न घेता संचालक मंडळांनी परस्पर खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपांप्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना झटका बसला आहे. याच मुद्द्यावरुन खडसेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला. ( मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कुटुंबासह भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा, पाहा VIDEO ) दूध संघाच्या चौकशी लावून काही मिळणार नाही. दुसरं काहीतरी शोधा, असा सल्ला एकनाथ खडसेंनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. नाथाभाऊला आणखी किती बदनाम करणार? असा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. एकनाथ खडसे व दूध संघाच्या संचालकांना बदनाम करण्याचा हा षडयंत्र असल्याचा आरोपही एकनाथ खडसे यांनी केला आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असून दोषी असतील त्याला शिक्षा होईलच, असेही यावेळी एकनाथ खडसे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








