भिवंडी, 30 जुलै: शहरातील नारपोली पोलीस ठाणे हद्दीतील कामतघर येथील अष्टविनायक बिल्डिंगमधील एका फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या मोठी चोरी झाली होती. फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचे लॅच लॉक बनावट चवीने उघडून घरातील सुमारे 13 लाख 21 हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुवर्णा सोनगीरकर या महिलेने 22 जुलै रोजी नारपोली पोलीस ठाण्यात घरात चोरी झाल्याची तक्रार दिली होती.
हेही वाचा.. भारुडात करायचा 'स्त्री' भूमिका! चिडवायची मुलगी, 'कंचना' सिनेमा पाहून केली हत्या
आरोपी दुसरा तिसरा कोणी नसून घरमालकाची मुलगी आणि तिचा प्रियकर आहे. आरोपी तरुणी ही वैद्यकीय शिक्षण घेत आहे. तिला प्रियकरसोबत पळून जाऊन लग्न करायचं होतं. यासाठी तिनं प्रियकराच्या मदतीनच स्वत: च्याच घरात डल्ला मारला. पोलिसांनी तरुणीसह तिच्या प्रियकरासह अटक करण्यात आली आहे. तरुणीला घरातूनच तर प्रियकराला धुळ्यातून ताब्यात घेतलं आहे. भिवंडी पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी असा लावला छडा...
पोलीस उपनिरीक्षक राहुल व्हरकाटे यांच्या नेतृत्त्वात पथकानं घटनास्थळाची पाहणी केली. या घरफोडीच्या गुन्ह्यात घरातील माहिती असलेल्या व्यक्तीचा हात असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दिशेनं फिरवली. बीएचएमएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या मुलीकडे तपास केला असता तिच्या बोलण्यातील विसंगती लक्षात आली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिनं आपल्या प्रियकर मित्रासोबत कट रचून ही स्वत: च्याच घरात घरफोडी केली. तरुणीला प्रियकरासोबत पळून जावून लग्न करायचं होती. या अनुषंगाने तिनं घरात डल्ला मारल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
हेही वाचा...गुप्तांगातून स्वॅब घेणे प्रकरण: शिवसेना व एमआयएम नगरसेवक आक्रमक
तपास पथकाने धुळे येथून प्रतीक तुषार लाळे (वय- 21) व हेमंत दिलीप सैंदाणे (वय- 21, दोघे रा.देवपूर धुळे) यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 55 हजार रोख व 8 लाख 96 हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.