धुळे, 9 जुलैः हातात पिस्तूल घेऊन फिल्मी अंदाजात टिक टॉकवर डायलॉगबाजी करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. विशेष म्हणजे मित्राच्या आगाऊपणाची दोन तरुणांना देखील चांगलीच अद्दल घडली आहे.
हेही वाचा...अँटी व्हायरल औषधी लवकरच राज्यात येणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
धुळे शहरातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या दीपक शिरसाट याने टिक टॉकवर गावठी कट्टा हातात घेत एक व्हिडिओ तयार केला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागला होता. त्यानंतर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना कारवाईचे आदेश दिलेत. यावेळी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला लागलीच अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपल्या अन्य 2 साथीदार मित्र पंकज परशराम जिसेजा व अभय दिलीप अमृतसागर याचे नाव सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अभयकडून पुन्हा एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसं जप्त केली आहेत.
या कारवाईत पोलिसांना दोन गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसं जप्त करण्यात आले आहे. दोन्ही पिस्तूलची किंमत एकूण 71 हजार 500 रूपये आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा...YES bank घोटाळ्यात अखेर ED ची मोठी कारवाई; राणा कपूरची 2200 कोटींची संपत्ती जप्त
दरम्यान या तिन्ही आरोपींनी ही गावठी पिस्तूल कुठून आणल्या आणि या माध्यमातून त्यांनी काही गुन्हे केले आहेत का? याचा तपास आत्ता पोलीस करीत आहेत.