बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव, 28 जुलै : सध्या टोमॅटोचे दर हे गगनाला भिडले आहे. पुण्यामध्ये एका शेतकऱ्याने टोमॅटो उत्पादनातून कोट्यवधी रुपये कमावले होते. आता धाराशीवमध्ये आल्यानं एका शेतकऱ्याला श्रीमंत केलं आहे. या शेतकऱ्याने अडीच एकरातच तब्बल कोट्यवधीचे उत्त्पन्न घेतले आहे. कळंब तालुक्यातील गणेश पाटोळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गणेश पाटोळे हे अद्रक उत्पादक शेतकरी आहे. गणेश यांनी पारंपरिक शेती सोडून आपल्या शेतात अडीच एकरावर आल्याची लागवड केली होती. आल्याला बाजारात किलोला 120 ते 150 रुपये भाव असल्याने गणेश यांना अपेक्षित 15 लाख रुपये उत्त्पन्न असताना पहिल्याच टप्प्यात त्यांना 45 लाख रुपये उत्त्पन्न मिळाले असून त्यांचा आणखी माल मार्केट जात असल्याने आणि भाव कायम असल्याने उत्त्पन्न कोटीच्या घरात जाईल, असे मोठ्या आनंदाने गणेश पाटोळे यांनी सांगितलं.
धाराशिव जिल्ह्यात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे पेरणी खोळंबली असून ज्या क्षेत्रात पेरणी झाली आहे. तिथे बहुतांश सोयाबिनची लागवड झाली आहे हे सगळं सोयाबीनचे क्षेत्र असताना गणेश यांनी आलं अर्थात अद्रक उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरल्याचं इतर शेतकरी सांगत आहेत. (1 लाखांचं डाळिंब चोरीला, चोरांचा प्रताप पाहून शेतकऱ्यानं लावला डोक्याला हात) ‘जे बाजारात विकतं ते शेतात पिकतं’ असं नेहमीच होत नाही पण यंदा टोमॅटोला आणि आल्याला बाजारात भाव मिळाला आहे. गणेश पाटोळे यांच्या शेतातही आलं पिकलं आणि ते बाजारात चांगल्या भावाने विकलं म्हणूनच ते आपल्या मेहनतीच्या जोरावर कोट्यधीश झाले हे मात्र खरं आहे.