मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरूवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमधून देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांनी लिहिलेल्या पत्रावर निशाणा साधला आहे. ‘सर्व गोष्टींवर चर्चा करण्याची सत्तारूढ पक्षाची तयारी आहे. आता आमची ताकदही वाढली आहे, पण या शक्तीचा दुरुपयोग न करता जास्तीत जास्त चर्चा घेऊन लोकहिताचे प्रश्न विरोधी पक्षाकडून आले तरीही, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. विरोधी पक्षाच्या वतीने एक पत्र आम्हाला देण्यात आलं आहे. विरोधी पक्षाला विषयच माहिती नाही, हे मी पहिल्यांदा बघितलं, त्यामुळे त्यांनी पत्राऐवजी ग्रंथ दिला आहे. जेवढ्या लक्षवेधी त्यांनी दाखल केल्या आहेत, त्या एकत्र करून त्यांनी पत्र दिलं आहे’, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ‘दादांचं काम पहाटे सुरू, मी रात्री उशिरापर्यंत, तर फडणवीस…’, मुख्यमंत्र्यांची फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतरचं हे पहिलंच अधिवेशन असणार आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपद स्वीकारलं आहे. या राजकीय भुकंपावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. ‘राज्यात जे काही झालं ते एकाच कारणामुळे झालं आहे. मोदीजींचं नेतृत्व देशाला पुढे घेऊन जात आहे आणि म्हणून लोक आमच्यासोबत येत आहेत. शिंदेसाहेब आणि आम्ही एकत्रच लढलो, मोदीजींना ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आलोत आहोत. देश आणि महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आमची राजकीय युती झाली आहे, आम्ही तिघे मिळून कुटनिती करणार आहोत,’ असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.