अमरावती, 03 जानेवारी : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चुकीमुळे त्यांची युती झाली नाही आणि त्यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवावा, असा सल्लावजा टोला कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला. अमरावतीत आयोजित स्वागत समारंभात त्या बोलत होत्या. अमरावती जिल्ह्यातील तिवसा इथं कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी यशोमती ठाकूर यांनी आपल्या शैलीत चौफेर फटकेबाजी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खूप जास्त बोलायची सवय असल्याने त्यांच्या चुकीमुळे शिवसेनेसोबत युती होऊ शकली नाही. त्यांनी आता थोडा इगो बाजूला ठेवला पाहिजे. ते मुख्यमंत्री असतांना विरोधात असल्या सारखे बोलत होते. आता त्यांची चिडचिड वाढली आहे त्यामुळे त्यांनी थोडा इगो बाजूला ठेवावा, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला. तसंच आघाडीच्या सरकारमध्ये काही लिमिटेशन आहे. जी मंडळी नाराज आहे. त्यांनी ती नाराजी बाजूला सारली पाहिजे त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या मतदारसंघात आम्ही काम करू, असे आज कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे त्यांच्या स्वागत समारंभाच्या वेळी सांगितले. महाविकासआघाडीमध्ये प्रत्येक स्तरावर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना प्रतिनिधित्त्व देण्याचा प्रयत्न केला आहे. हे आघाडीचे सरकार असल्याने काही लिमिटेशन आहे,त्यामुळे जी लोक नाराज आहे. ज्यांचे कार्यकर्ते नाराज आहे त्यांनी ती नाराजी बाजूला सारली पाहिजे, असं आवाहनही त्यांनी तिन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना केलं. विकासाच्या दृष्टीने महाविकास आघाडी झाली आहे. सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात काम होतील, असं आश्वासनही यशोमती ठाकूर यांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.