मुंबई, 24 सप्टेंबर : भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते अमित शहांसोबत फोनवर चर्चा केल्यामुळे घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, या चर्चेवर भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्याबद्दल मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया देऊन पुढे बोलण्याचं टाळलं. भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्यासोबत एकनाथ खडसे हे दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला गेले होते. पण, अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. पण एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली आहे अशी माहिती खुद्द भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी दिली. या खुलाशानंतर खडसेंच्या घरवापसीची चर्चा रंगली आहे. मात्र, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी बोलण्याचं टाळलं आहे. अमित शहा आणि एकनाथ खडसे यांनी फोनवर चर्चा झाली, याबद्दल मला कल्पना नाही, असी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. (‘दसरा मेळाव्याला गुलाल उधळत या, पण…’, उद्धव ठाकरेंची सर्वात पहिली प्रतिक्रिया) दरम्यान, अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहे, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे. अमित शहा यांना भेटू नये, असा काही नियम आहे का, अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे माझे जुने संबंध आहे. गोधडीमध्ये होते, तेव्हा पासून परिचय आहे. मी अमित शहा यांनी एकवेळा भेटलो असं नाही, याआधीही भेटलो आहे. देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी भेटणार आहे म्हणून याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं खडसे म्हणाले. एका घरामध्ये दोन पदं आहे, हे काही आमच्याच घरात नाही. गिरीश महाजन यांच्या घरामध्ये 30 वर्षांपासून साधनाताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. आता नगराध्यक्ष आहे. गुलाबराव पाटील यांचा मुलगा हा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. एका घरामध्ये अनेक जण असतातच. राजकारणामध्ये ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असते, ते निवडून येतात, ज्यांच्यामध्ये क्षमता नसते जनता त्याला पराभूत करते, असंही खडसे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.