बीड 12 सप्टेंबर : कोळशापासून विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणी आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन, चार आणि पाच हे बंद करण्यात आलेले आहेत.. 210 मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारी सगळी सामग्रीही भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे.
याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा आणि खरंतर परळी शहराची ओळख अगदी या चिमणीवरून होती. ती चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती, जी आज इतिहासजमा झाली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्रातील बंद पडलेल्या संच क्रमांक तीनची 120 फुट उंच चिमणी आज पाडण्यात आली pic.twitter.com/MZeontkWt5
— News18Lokmat (@News18lokmat) September 12, 2022
210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीनचं आयुर्मान संपल्याने महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने हा संच स्क्रॅपमध्ये काढला होता. स्क्रॅप अंतर्गत सोमवारी सकाळी ही चिमणी पाडली गेली. यावेळी विद्युत केंद्राचे अधिकारी, सुरक्षा विभागाचे कर्मचारी आणि कंस्ट्रक्शन विभागाचे कामगारही उपस्थित होते. ही चिमणी पाडतानाचा व्हिडिओ समोर आला असून अवघ्या 25 सेकंदात ही चिमणी जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं.
संच क्रमांक 3 हा सन 1980 मध्ये कार्यान्वित करण्यात आला होता. मात्र, आयुर्मान संपल्याने 2015 पासून हा संच बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर 2019 पूर्वी हा संच स्क्रॅपमध्ये काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आज अखेर क्रमांक तीनची चिमणी सकाळी जमीनदोस्त करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Live video