पंढरपूर, 25 फेब्रुवारी : दिल्लीमध्ये CAA आणि NRC विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. यामध्ये आतापर्यंत 11 जणांचा जीव गेला आहे. या संपूर्ण प्रकारात काँगेस आणि बाकीचे पक्ष आहे त्यांच्या माध्यमातून दिल्ली पेटवण्यात आली असा गंभीर आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.
रामदास आठवले आज पंढरपुरात संत मेळाव्यास आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर आरोप केला. दिल्लीमध्ये हिंसाचाराचा आगढोंब उसळला आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने लोकांना भडकावण्याचं काम केलं आहे. त्यामुळे दिल्ली पेटली आहे. दिल्लीसह भारत देश शांत राहावा, असं मत आठवलेंनी व्यक्त केलं.
तसंच, देशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले असताना दिल्लीमध्ये हिंसाचाराची घटना घडत असेल तर या घटने मागे कोणाचा हात आहे. याची चौकशी करावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली.
दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशीही दिल्लीत हिंसाचार सुरुच आहे. दोन गटांमध्ये दगडफेकसुद्धा झाली. त्यानंतर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आली आहे. हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महिन्याभरासाठी जमावबंदी लागू केली आहे. ईशान्य दिल्लीत भडकलेल्या हिंसाचारात आतापर्यंत 11 जणांचा बळी गेला आहे.
मौजपूर भागामध्ये अद्याप तणावाचे वातावरण आहे. या परिसरात बऱ्याच प्रमाणात नासधूस करण्यात आली आहे. पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. तसंच पत्रकारांनी काढलेले फोटो आणि व्हिडिओ डिलिट करायला लावल्याचा धक्कादायक प्रकारही घडला आहे.
दिल्लीत दुपारच्या सुमारास दगडफेकही झाली. यावेळी जमावाने दोन पत्रकारांसोबत धक्काबुक्की केली. यात CNN News18 च्या एका महिला पत्रकाराचा समावेश आहे. यात जखमी झालेल्या महिला पत्रकारावर सध्या उपचार सुरू आहेत.
आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जाळपोळीच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या असून आग नियंत्रणासाठी आलेल्या अग्निशमन दलाच्या बंबावरही दगडफेक झाली.
जाफराबाद आणि मौजपूर भागात हिंसाचाराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी माध्यमांना माहिती दिली. केजरीवाल म्हणाले की, गृहमंत्र्यांसोबत झालेली बैठक सकारात्मक होती आणि केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.