मुंबई, 6 ऑक्टोबर : बुधवारी मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यानंतर राज्याचं राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर झाला, तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा वांद्र्याच्या बीकेसी मैदानात झाला. या दोन्ही मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दसऱ्याच्या दिवशी महाराष्ट्राचं लक्ष या दोन्ही मेळाव्यांकडे लागलं होतं, कारण पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळाव्यांचं आयोजन झालं. या दोन्ही दसरा मेळाव्यांकडे सामाजिक संस्थांचंही लक्ष होतं. ठाकरे आणि शिंदे यांच्या मेळाव्यात कुणाचा आवाज अधिक होता, हे मोजण्यात आलंय. आवाज फाऊंडेशनने या मेळाव्यांच्या आवाजाची मोजणी केली आहे. आवाज फाऊंडेशनच्या मोजणीमध्ये शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात 101.6 डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला आहे. तर बीकेसीमध्ये 88 डेसिबल आवाजाची नोंद झाली. नेत्यांनी केलेल्या भाषणात सर्वाधिक आवाज शिवसेनेच्या प्रवक्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा होता. किशोरी पेडणेकर यांच्या भाषणाचा आवाज 97 डेसिबलपर्यंत पोहोचला. तर शिंदे समर्थक खासदार धैर्यशील माने यांच्या भाषणाचा आवाज 88.5 डेसिबल नोंदवला गेला. दुखावलेल्या बापाचं पत्र! मुलावरची टीका जिव्हारी, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार कोणाच्या सभेला किती गर्दी? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या मेळाव्याला अंदाजे 1 लाख 25 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त)जमा झाले होते. याच मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा पार पडली होती. पण, त्यांच्या सभेला जवळपास 97 हजार कार्यकर्ते (5 ते 7 हजार कमी किंवा जास्त) उपस्थितीत होते. तर दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यालाही यावेळी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मैदानाची क्षमता ही 50 हजार इतकी आहे. पण, यंदाच्या मेळाव्याला जवळपास 65 हजार लोकांनी हजेरी लावली. त्यामुळे गर्दी जमवण्यामध्ये शिंदे गटाने सरशी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







