मुंबई, 30 सप्टेंबर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला आता अवघे काही दिवस शिल्लक असतानाच राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एकनाथ शिंदे गटाकडून आता दसरा मेळाव्याचा दुसरा टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये शिंदे गटाकडून थेट बाळासाहेबांचं भाषणच वापरण्यात आलं आहे. या टिझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील काही आक्रमक वाक्य तसंच आम्ही विचारांचा ज्वलंत हुंकार, भगव्याचा हा जय जयकार, अशी टॅगलाईनही देण्यात आली आहे. शिवसैनिकाला बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिरवता येणार नाही, ही माझी भावना आहे, ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे, असं बाळासाहेबांचं भाषणातलं विधान या टिझरमध्ये वापरण्यात आलं आहे. शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या वादावेळीच टिझरमध्ये बाळासाहेबांचं हे वक्तव्य वापरण्यात आलं आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून आणखी एक टिझर लॉन्च, यावेळी वापरलं बाळासाहेबांचं भाषण#EknathShinde #Shivsena pic.twitter.com/AY1tU8HJca
— News18Lokmat (@News18lokmat) September 30, 2022
एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक निष्ठ, एक नाथ अशी वेगवेगळी कॅप्शन शिंदेंच्या या टिझरमध्ये वापरण्यात आली आहे. शिंदेंच्या या टिझरमध्येही बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि स्वत: एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलं आहे. याआधी कालही शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याचा पहिला टिझर लॉन्च करण्यात आला होता. या टिझरमध्ये फक्त बाळासाहेबांचा आवाज वापरण्यात आला होता. दुसऱ्या टिझरमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचं भाषणच वापरलं आहे. पहिल्या टिझरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचा पुतळा तर एकनाथ शिंदे यांचा फोटोही दिसत आहे. ठाकरे का शिंदे, दसरा मेळाव्याचा कुणाचा टिझर भारी? दोन्ही Video पाहा एकीकडे शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू असताना ठाकरेंकडूनही दसरा मेळाव्याचा टिझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘एक नेता, एक झेंडा, एक मैदान…शिवसेनेच्या पारंपरिक ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे साक्षीदार व्हा!’ असं कॅप्शन देत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचा टिझर लॉन्च केला आहे. निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार, असं या टीझरमध्ये म्हणण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे ज्या स्टाईलने भाषणाची सुरुवात करतात तेही दाखवण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. तर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानात होणार आहे.