Home /News /maharashtra /

परीक्षेसाठी विद्यार्थी पोहोचले पण पेपरही नाही अन् पर्यवेक्षकही नाही, दापोलीतील परीक्षा केंद्रावर सावळा गोंधळ

परीक्षेसाठी विद्यार्थी पोहोचले पण पेपरही नाही अन् पर्यवेक्षकही नाही, दापोलीतील परीक्षा केंद्रावर सावळा गोंधळ

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात (Dapoli) आज एक वेगळाच गोंधळ पाहायला मिळालाय आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेदरम्यान हा गोंधळ झाला.

दापोली, 28 फेब्रुवारी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात (Dapoli) आज एक वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. आरोग्य विभागाच्या लेखी परीक्षेदरम्यान हा गोंधळ झाला. दापोली येथील एन के वराडकर (NK Varadkar College, Dapoli) कॉलेजमध्ये आज आरोग्य विभागाच्या परीक्षा होत्या. त्यासाठी राज्यभरातून सहाशे विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. याठिकाणी 10 वाजता परीक्षा सुरू होणार होती मात्र सकाळी 9.30 वाजले तरी देखील परीक्षा केंद्र बंद होते, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. यात भर म्हणून याठिकाणी केंद्राने केवळ एकच सुपरवायझर नेमला होता. तर अन्य कुणीच त्याठिकाणी पोहोचले नव्हते. शिवाय परीक्षा केंद्रात असणाऱ्या बाकांवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर सुद्धा टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण होते. कोणत्याही प्रकारची सुरक्षा याठिकाणी नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून वारंवार व्यक्त केली जात होती. त्याचप्रमाणे परीक्षेस विलंब होत असल्याकारणाने पेपर फुटण्याचीही भीती होती. अखेर दोन तासाने ही परीक्षा सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी सकाळी आठ वाजल्यापासून परीक्षार्थी परीक्षा केंद्रावर हजर होते. मात्र पेपर उपलब्ध झाले नव्हते. अनेकांना सेंटर वर बसण्यासाठी कोणती सुविधा करण्यात आली नव्हती. तसंच ज्यांच्या हॉल तिकिटावर सेंटर दापोली दाखवण्यात आलं होतं, त्यांना देखील याठिकाणी परीक्षा नाही असं सांगत परत पाठवण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता.  त्यामुळे मराठवाडा विदर्भातून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झालं असून त्यांना मनस्ताप सुद्धा सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली आहे. (हे वाचा-कोरोना लशीसह उद्यापासून लागू होणार हे बदल, सामान्यांच्या जीवनावर थेट परिणाम) कोविडच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या परीक्षेचा चांगलाच गोंधळ उडाला. विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा रद्द करावी व पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी केली होती पण दोन तासाने परीक्षा सुरू करण्यात आली आहे. एकीकडे दापोलीतील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. अशावेळी परीक्षाकेंद्रावर होणारा असा गोंधळ टाळता आला असता, असं मत व्यक्त केलं जात आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Dapoli, Examination, Maharashtra, Mumbai, N k varadkar college, Ratnagiri

पुढील बातम्या