सांगली, 24 जुलै: मागील तीन दिवसांपासून सांगलीसह (Sangli) कोल्हापूर आणि कोकणात पावसानं थैमान (Heavy Rainfall) घातलं आहे. कमी वेळात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संबंधित जिल्ह्यातील नदी, नाले, ओढे ओसंडून वाहत आहेत. सखल भागात राहाणाऱ्या असंख्य लोकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर हजारो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीतील जीव जंतूनी देखील मानवी वस्तीत प्रवेश केला आहे. पुरासोबत नवीन संकट देखील मानवी वस्तीत वाहून आलं आहे. खरंतर, कृष्णा नदीत मगरींचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. पण पुराच्या पाण्यामुळे (Flood water) या मगरी (Crocodiles) वाहत मानवी वस्तीत आल्या आहेत. आता सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पावसानं उसंत दिल्यानं पाण्याची पातळी ओसरत आहे. अशात सांगली जिल्ह्याच्या वाळवा परिसरातील लक्ष्मी नगर भागात रस्त्यावर मगर फिरताना स्थानिक नागरिकांना आढळली आहे. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. हेही वाचा- कोल्हापूर महापुराचा फटका रुग्णालयांना; बोटीतून रुग्णांचे स्थलांतर, पाहा VIDEO लक्ष्मीनगर परिसरात राहणाऱ्या एका नागरिकांनं मगर रस्त्यावर फिरत असतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून वाळवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खरंतर कृष्णा नदीला पूर आल्यानंतर अनेक मगरी सध्या बाहेर येत असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली आहे. 2019 साली आलेल्या पुरातही असे काही प्रकार निदर्शनास आले होते. त्यामुळे परिसरात केवळ एकच मगर नसून बऱ्याच मगरी पुराच्या पाण्यासोबत मानवी वस्तीत वाहून आल्या असल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्यातून मगर थेट रस्त्यावर pic.twitter.com/krxBQUb3FN
— News18Lokmat (@News18lokmat) July 24, 2021
हेही वाचा- VIDEO : कोल्हापुरातील शेकडो गावांना महापुराचा फटका; महामार्गावर 6 फूट पाणी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आज पावसानं काहीशी उसंत दिली आहे. त्यामुळे पुरजन्य परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. अनेक ठिकाणी पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे. पण बुधवारी रात्री पासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सांगलीसह कोल्हापूर आणि कोकणातील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं असून भूस्खलनामुळे शेकडो जणांचे प्राणही गेले आहेत. घटनेच्या 48 तासांनंतरही बऱ्याच नागरिकांना अद्याप शासकीय मदत पोहोचली नाही.

)







