रत्नागिरी, 6 ऑगस्ट: रत्नागिरी जिल्हा कोविड रुग्णालयात सेवा देणारे कोरोना योद्धा डॉ. दिलीप मोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेले काही दिवस त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातच उपचार सुरु होते. बालरोग तज्ज्ञ म्हणून सेवानिवृत्त होऊनही जिल्हा कोविड रुग्णालयात आपली सेवा देणाऱ्या डॉ. मोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे आरोग्य कर्मचारी आणि रत्नागिरीकर हळहळले आहेत.
हेही वाचा...सुशांत मृत्यू प्रकरणानंतर पालघर लिंचिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टानं सरकारला फटकारलं
सेवाभावी डॉक्टर हरपला..
डॉ. दिलीप मोरे हे रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना IPGSअंतर्गत पुन्हा सेवा देण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार ते गेली 7 वर्षे जिल्हा रुग्णालयात आपली सेवा बजावत होते. ही सेवा देताना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या तब्बल 42 लहानग्या कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर यशस्वी उपचार करुन डॉ.मोरे यांनी त्यांना कोरोनामुक्त केले होते. त्यामुळे त्याना लहांनग्यांचे देवदूत म्हटले जात होते.
खरं तर आपलं वय 65 असल्यामुळे आता आपल्याला कोविड वॉर्डमध्ये आणखी सेवा देता येणार नाही, असं त्यांनी प्रशासनाला कळवलेही होतं. मात्र, ही त्यांची सेवा सुरु असतानाच त्यांना कोरोनानं गाठलं. आणि त्यांची प्रकृती खालावली. कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. सुरुवातीच्या दिवसात ते उपचारांना प्रतिसादही देत होते. मात्र, सततचा ताण आणि वाढतं वय यामुळे डॉ. मोरे यांचा श्वसनाचा त्रास वाढत गेला. उपचार सुरु असताना गुरुवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
हेही वाचा..फोटो दिसणाऱ्या या चिमुरडीने मृत्यूवर मिळवला विजय, 4 तास पुरात वाहिली आणि...
डॉ. मोरे यानी आपल्या सेवाकाळात सहकारी नर्सेस, वॉर्डबॉय आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यातही ते सर्वांचे आवडते, असे लिडर होते. रत्नागिरी शहरात ते लहान मुलांसाठीचा छोटासा दवाखानाही चालवत होते. विशेष म्हणजे गरिब रुग्णांकडून पैसे न घेताही ते उपचार करत होते. त्यामुळेच ते गरीबांचे डॉक्टर म्हणूनही परिचित होते. अशा या सेवाभावी मनमिळाऊ डॉक्टरला, ज्यांनी अनेकाना कोरोनापासून वाचवलं, त्यांनाच कोरोनामुळे मृत्यू यावा, याचं अतिव दु: ख होत असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus