नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी : आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्सनंतर आता 1 मार्चपासून इतर नागरिकांचंही कोरोना लसीकरण (corona vaccination) केलं जाणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि 45 पेक्षा जास्त वय असलेल्या पण इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. पण या टप्प्यातील सरसकट सर्वांनाच मोफत कोरोना लस दिली जाणार नाही आहे. काही जणांना मोफत कोरोना लस मिळेल तर काही जणांकडून शुल्क आकारलं जाईल. दरम्यान या गटात मंत्र्यांचाही समावेश होतो. त्यामुळे त्यांच्यासाठी नेमका काय नियम असेल असा प्रश्न उपस्थित होतोच.
मोदी सरकारनं आपल्या मंत्र्यांना कोरोना लस देण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमधील सर्व मंत्री कोरोना लस पैसे देऊनच घेतील. म्हणजे त्यांना कोरोना लस मोफत मिळणार नाही. सर्व मंत्री स्वतःच्या कोरोना लशीचा खर्च स्वतःच उचलणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. असं वृत्त
आज तकनं दिलं आहे.
हे वाचा - 1 मार्चपासून सर्वसामान्यांचं लसीकरण; फक्त या लोकांना मिळणार मोफत कोरोना लस
1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक ज्यांना इतर आजार आहेत त्यांचं लसीकरण केलं जाणार आहे
सरकारी केंद्रं आणि खासगी रुग्णालयात हे लसीकरण केलं जाईल. यामध्ये 10 हजार सरकारी केंद्रांचा आणि 20 हजार खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. ज्यांना सरकारी केंद्रावर लस दिली जाईल, त्यांना मोफत लस मिळेल. तर ज्यांना खासगी रुग्णालयात लस दिली जाईल, त्यांच्याकडून शुल्क आकारला जाईल. कोरोना लशीसाठी किती पैसे घेतले जातील याबाबत आरोग्य विभाग दोन तीन दिवसांत घोषणा करेल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं.
हे वाचा - महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी मोदी सरकारची धडपड; मदतीला केंद्रीय समिती
देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झालं. सध्या आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. 23 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 1.19 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. 23 फेब्रुवारीला दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 1.61 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यापैकी 63,458 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेतला. महाराष्ट्रात 9,29,848 जणांनी पहिला आणि 73,858 जणांनी दुसरा डोस अशा एकूण 10,03,706 लोकांनी लस घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.