सातारा, 6 मार्च : कोरोना व्हायरस प्रभावित इराण देशामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर येथील 44 नागरिक अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी एक पत्र लिहित विनंती केली आहे.
महाराष्ट्रातील काही पर्यटक इराक देशातील करबला शहराला भेट देण्यासाठी इराण मार्गे विमानाने निघाले होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे सर्व विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. यासंदर्भात माहिती मिळताच परराष्ट्र मंत्रालयाशी तात्काळ संपर्क साधला. भारत सरकार कडून कोरोना तपासणीसाठी लॅबोरेटरी सुरू केली जाणार आहे.
कोरोना तपासणीसाठीच्या लॅबोरेटरीमध्ये भारतीयांची तपासणी करून कोरोना बाधितांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात तिथेच ठेवले जाईल. तर ज्यांना व्हायरसची बाधा झालेली नाही त्यांना विशेष विमानाने मायदेशी पुन्हा आणण्यात येईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाडून माहिती देण्यात आली असल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना भारतात परतण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे, असंही पाटील म्हणाले.
भारतात रुग्णांची संख्या पोहचली 31 वर
कोरोनाव्हायरस (Coronavirus) या भयंकर विषाणूचा संसर्ग आता तब्बल 80 देशांमध्ये पोहचला आहे. तर, भारतातही या विषाणूचा धोका जाणवू लागला आहे. देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 31वर पोहचली आहे. यातील तीन रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले आहेत. दुसरीकडे देशातील कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे, असा दावा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केला आहे. आरोग्यमंत्री हर्षवर्धन स्वत: गुरुवारी रात्री दिल्ली विमानतळावर पोहोचले. त्याच वेळी त्यांनी स्क्रीनिंगसह सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला.
हेही वाचा-सम-विषम नाही तर दुसऱ्याच प्रकरणात इंदोरीकर महाराजांनी व्यक्त केली दिलगिरी
सध्या भारतात कोरोनामुळे त्रस्त रूग्णांची संख्या 31 आहे. गुरुग्राममध्ये 31 पैकी 15 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, दिल्ली रुग्णालयात 10 रुग्ण दाखल आहेत, एक रुग्ण तेलंगणात आहे, तर २ रुग्ण जयपूरमध्ये आहेत. या 31 रूग्णांपैकी 16 रुग्ण इटलीचे रहिवासी आहेत जे भारतात फिरायला भेटायला आले होते. तर, 6550 फ्लाइटमधून आतापर्यंत 6,49,452 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.