मुंबई, 26 फेब्रुवारी: गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात दररोज 8 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन (Statewide Lockdown) होणार का? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. यावर आता राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar) यांनी मोठा खुलासा केला आहे. राज्यात कोरोना फोफावत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं जाणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे. ते शुक्रवारी नागपूर याठिकाणी पत्रकारांशी बोलत असताना संबंधित माहिती दिली.
लॉकडाउन नाही पण निर्बंध कडक
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आलेख झपाट्याने वाढताना दिसत आहे. यावर उपाय म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे निर्बंध कटाक्षाने पाळावे लागतील, असं वडेट्टीवार म्हणाले. संपूर्ण लॉकडाउन नसला, तरी नागरिकांनी निर्बंध पाळावेत, मास्कचा नियम पाळावा यासाठी कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे.
मुंबईच्या लोकल फेऱ्या होणार कमी
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही गेल्या दोन दिवसांपासून 1 हजाराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, सध्या सामान्य नागरिकांसाठी सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये कपात करणार येणार आहे. त्याचबरोबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेवून वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरही निर्बंध घालणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात 8,700 रुग्ण आढळले आहेत.
देशात महाराष्ट्र आणि केरळमध्ये सर्वाधिक कोरोना विषाणूची बाधा झालेले रुग्ण आढळत आहेत. देशातील 65 ते 70 टक्के कोरोना रुग्ण केरळ आणि महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुले ही दोन राज्ये देशासाठी कोरोना हॉटस्पॉट ठरत आहेत. त्यामुळे या याठिकाणी काही प्रमाणात कडक निर्बंध वाढवले जाणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, याठिकाणी राज्यव्यापी लॉकडाऊन असेल, तथापि कोरोना प्रसाराचा वेग कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रात काही कठोर नियम आणि कायदे लागू करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
हे ही वाचा-चिंताजनक!नव्या कोरोना रुग्णांबाबत तज्ज्ञांचा खुलासा, फुफ्फुसात होतायेत गंभीर बदल
लोकल ट्रेनच्या सेवेत कपात करणे, बाजारपेठांच्या कडक निर्बंध लागू करणे, बसगाड्यातील गर्दी कमी करणे यावर काम करण्याची गरज आहे. त्याचबरोबर शहरातील मोठंमोठे मॉल्स बंद ठेवणे. याव्यतिरिक्त मंगल कार्यालयांवर आणि इतर लग्न स्थळावर नजर ठेवणे गरजेचे आहे. त्याठिकाणी मोठी गर्दी होणार नाही, याची दक्षता घेणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा-राज्यात का होतोय कोरोनाचा उद्रेक? सरकारनं सांगितली 3 कारणं
राज्यातील परीक्षांबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, सध्या राज्यात सर्व गोष्टींचे आयोजन शक्यतांवर केलं जात आहे. तसेच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेता येतील का? याचा विचारही आम्ही करत आहोत. जसं की तामिळनाडूमध्ये यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेण्याची गरज आहे, यावर अनेकांची मतं घेवून विचार केला जात आहे. आम्ही सर्व प्रकारच्या शक्यतांवर विचार करत आहोत, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Lockdown, Maharashtra, Vijay wadettiwar