मुंबई, 25 फेब्रुवारी : 24 फेब्रुवारीला 2021 या वर्षातील सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एकाच दिवसात 8807 कोरोना रुग्ण आढळले. तब्बल चार महिन्यांनंतर राज्यात आठ हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण दिसून आले. 23 फेब्रुवारीपर्यंत 6 हजारांपर्यंत असलेल्या एकाच दिवसात 8 हजारांचा आकडा पार केला आहे. राज्यात कोरोना असा अचानक झपाट्यानं का वाढू लागला, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राज्य सरकारनं यामागील नेमकी कारणं सांगितली आहेत.
होम क्वारंटाइन (home quarantine) आणि सोशल डिस्टन्सिंगच्या (social distancing) नियमांचं उल्लंघन आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पुरेसा स्रोत उपलब्ध न होणं ही राज्यातील कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्याची कारणं आहेत. अशी माहिती राज्याच्या वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यातील तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर होम क्वारंटाइन होणं असो किंवा एखाद्या ठिकाणीहून परतल्यानंतर विशिष्ट कालावधीसाठी आयसोलेट होणं, लोक याचं पालन करताना दिसत नाही. त्यामुळे आम्ही हतबल आहोत. असं करून लोक लॉकडाऊनसारखं कडक बंधन ओढावून घेत आहेत, असंच दिसतं आहे.
लोकांनी या नियमांचं पालन करावं, यासाठी महसूल, गृह आणि आरोग्य विभागाची बैठकही झाली. आरोग्य कर्मचारी जेव्हा नागरिकांच्या कोरोना टेस्टिंगसाठी जातील तेव्हा त्यांनी आपल्यासोबत पोलिसांनाही घेऊन जावं, असा सूचना या बैठकीत करण्यात आल्या. कारण काही लोक टेस्टिंगला नकार देत आहेत आणि आवश्यक ते सहाय्य करत नाहीत, असंही डॉ. साळुंखे यांनी सांगितलं.
हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचं नवं रूप; नव्या स्ट्रेनपासून कसा कराल स्वत:चा बचाव?
राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील म्हणाल्या, "कोरोनाचे काही नियम शिथील करण्यात आले पण लोक आता बेजबाबदारपणे वागून जे काही आपण आतापर्यंत मिळवलं त्या सर्व प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. लोकांकडून सरकारला समजुतीची आणि सहकार्याची अपेक्षा आहे"
शिवाय गेले तीन आठवडे ज्या काही राजकीय रॅली झाल्या, सोहळे झाले, त्यामुळेदेखील कोरोना वाढला आहे, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या 24 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार राज्यात 8,807 नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर आता 2.45 टक्के आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 20,08,623 झाली आहे. त्यापैकी 59,358 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) 94.70% आहे.
हे वाचा - 'हो आम्हीच कोरोना पसरवला', अखेर तबलिगी जमातीनं दिली गुन्ह्याची कबुली
राज्यातील कोरोनाव्हायरला नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारनं धडपड सुरू केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी केंद्रानं उच्च स्तरीय मल्टीडिसिप्लिनरी टीम रवाना केली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पातळीवरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ही तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. राज्यातील प्रशासनासोबत ही टीम काम करेल आणि कोरोना प्रकरणं का वाढत आहे, त्याची कारणं शोधेल. हे पथक राज्य सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करेल. आवश्यक ती पावलं उचलेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus