पुणे, 10 एप्रिल : देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. सर्वाधित कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहे. राज्याची राजधानी मुंबई आणि पुण्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यातच पुण्यात भीषण परिस्थिती आहे. परंतु, याही परिस्थितीत कोरोनावर मात करण्याची संख्या वाढत चालली आहे.
पुण्यात आज 5 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाच कुटुंबातील 5 कोरोनाबाधित रुग्ण आज पूर्णपणे बरे झाले, असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा - एप्रिल अखेरीस कोरोनापासून होणार सुटका? असा आहे मोदी सरकारचा प्लॅन
कोरोनाची लागण झाल्यामुळे या पाचही जणांना उपचारासाठी नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गेले 14 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. अखेर आज 14 दिवसानंतर सर्वांच्या पुन्हा एकदा चाचण्या घेण्यात आल्यात. या चाचण्यामध्ये सर्व जण निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.
आज सकाळीच या पाचही जणांना नायडू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे शहरात एकूण 23 जणांनी कोरोनावर मात केली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आढळलेले पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्यावर नायडू हॉस्पिटलमध्येच उपचार करण्यात आले होते. त्यांनीही कोरोनावर मात केली होती. याबद्दल त्यांनी नायडू रुग्णालयाचे आभारही मानले होते.
पुण्यात सर्वात जास्त मृत्यूदर
हेही वाचा - नाशिकमध्ये झपाट्याने पसरतोय कोरोना, माळेगावमधील 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
दरम्यान, राज्यात पुणे आणि मुंबईत सर्वाधिक कोरोनारुग्ण आढळले आहेत. याच दोन्ही महापालिका आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक मृत्यूही झाले आहेत. पण कोरोनाबाधितांची संख्या विचारात घेतली, तर Coronavirus चं सर्वात उग्ररूप सध्या पुण्यात दिसत आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांचा मृत्यूदर खूपच जास्त आहे. 9 एप्रिलला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार पुण्यात आतापर्यंत 181 कोरोनारुग्ण सापडले आहेत आणि या शहरात 24 बळी गेले आहेत. याचा अर्थ पुण्यात कोरोनाचा मृत्यूदर 13 टक्क्यांच्या पुढे आहे. कोरोनाचं सर्वात भीषण रूप पाहिलेल्या इटलीहूनही हा मृत्यूदर जास्त आहे.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.