Home /News /maharashtra /

#21दिवस : शहरं लॉकडाउन; गावांचं काय? 'इथे परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा'

#21दिवस : शहरं लॉकडाउन; गावांचं काय? 'इथे परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा'

बुलढाणा जिल्ह्यातल्या एका सजग गावकऱ्याने News18 Lokmat ला सांगितली धक्कादायक परिस्थिती. तुम्हीही तुमच्या आसपासची परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवा.

    मुंबई, 25 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा lockdown जाहीर केला. महाराष्ट्रात त्याअगोदरच मोठी शहरं बंद झाली होती. पण अजूनही गावागावांत परिस्थितीचं गांभीर्य पोहोचलेलं नाही. खामगाव तालुक्यातल्या (जिल्हा बुलढाणा)राहुड, पो. घाणेगाव या गावातले आमचे वाचक वैभव देवळे यांनी गावातली परिस्थिती आमच्याशी शेअर केली. त्यांनी सांगितलेलं हे धक्कादायक वर्णन. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी ही परिस्थिती असेल तर पुढे काय होणार? त्यांनी पाठवलेला वृत्तांत त्यांच्याच शब्दांत... नमस्कार, मी वैभव अनिल देवळे, बुलढाणा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात राहतो.  राहुड, पो. घाणेगाव (ता. खामगांव, जि. बुलढाणा)या माझ्या गावातल्या आजच्या परिस्थितीबद्दल तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.. मागील दोन वर्षांपासून मी सिल्व्हरसिटी हॉस्पिटल खामगांव इथे हॉस्पिटलला सेवा देत होतो. आपल्या देशामध्ये सध्या जी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पण हॉस्पिटलला सेवा देण्याची माझी इच्छा होती. परंतु काल माझ्या आई चा मला कॉल आला आणि आई मला सांगितलं की, 'तुझे बाबा काही ऐकत नाहीत आणि नेहमीसारखंच बाहेर फिरायला जातात. ग्रामपंचायत तसंच मंदिराजवळ नेहमी सारखीच मेहफिल जमवतात.' आईला मी ओरडून ओरडून सांगितलं की, बाबांना समजावून सांग. पण बाबा काही ऐकतच नव्हते. आई आणि बाबांची काळजी वाटत होती, म्हणून काल रात्रीच हॉस्पिटलला माहिती देऊन मी रात्री 11:30 च्या जवळपास घरी पोहचलो. आज लॉकडाउनचा पहिला दिवस मी गावात पाहिला आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षा आलं. आज माझा पूर्ण देश लॉक डाऊन असलेला पहिला दिवस. आणि गावात मात्र त्याचं सोयरसूतक नसल्यासारखी परिस्थिती होती. आज गुढीपाढवा म्हणून मी सकाळी उठलो, तर आई म्हणाली, 'नवीन वर्ष आहे, मला मंदिरात पूजेला जायचं आहे.' मी आईला सांगितलं, 'आपल्या देशावर कोरोना महामारीचं संकट गेल्यावर गुढीपाडवा साजरा कर.' आईला माझ बोलणं योग्य वाटलं. ती बाहेर गेली नाही. पण नंतर पाहिलं - गावात नेहमीप्रमाणे लहान मुलं घराबाहेर खेळत होती. नेहमीप्रमाणेच लोक चौकात बसून गप्पा मारत होते. सर्व महिला मंडळी गुढीपाडव्या निमित्त मंदिरात पूजेसाठी जात होत्या. आईने आणखी धक्कादायक गोष्टी सांगितल्या. गावात गेल्या काही दिवसांत बाहेरगावाहून(विशेषतः मोठ्या शहरांमधून )आलेल्या बऱ्याच तरुण मुलांनी आरोग्याची तपासणी केलेलीच नाही. ते तसेच गावांत फिरत आहेत. लोकांना भेटत आहेत. गावामध्ये बाहेरगावातले बांगड्या विकणारे, कपडे विकणारे, कटलरीचं सामान विकणारे नियमितपणे येताहेत. त्यांच्यावर कुठलेही निर्बंध नाहीत. त्यातच गावात बऱ्याच लोकांची घराची बांधकामं सुरू आहेत. त्यामुळे पिंपळगाव राजा इथून बांधकाम करणारे बरेच मिस्त्री आणि कामगार गावात येत आहेत (पिपंळगाव राजा इथे जवळपास 800-1000 लोक पुणे-मुंबई सारख्या शहरातून तसंच विदेशातूनही आलं असल्याचं समजतं.) यामुळे माझी चिंता आणखी वाढली. पूर्ण देशात लॉक डाऊन आहे, तर ग्रामीण भागाकडे कुणाचं लक्ष का नाही? ग्रामीण भागात राहण्यापेक्षा आता शहरी भागातील जनता सुरक्षित आहे, असं वाटायला लागलं आहे. ग्रामीण भागातील जनता बिलकुलही सुरक्षित राहिलेली नाही. गावात कोणत्याही प्रकारचा बदल मला दिसला नाही. म्हणून आपण काय करू शकतो या बाबतीत मी खूप विचार केला. मी गावच्या पोलीस पाटील साहेबांना भेटायला जातो, असं मी आईला सांगितलं. पण आई नको म्हणाली. गावात आम्हाला राहावं लागतं, लोक आम्हाला वाळीत टाकतील, आमचं जगणं मुश्कील होईल वगैरे वगैरे... कारणं आईने दिली. त्यावरून मी आईशी भांडलोसुद्धा. पण कर्तव्य म्हणून मी गावचे पोलीस पाटील यांना भेटायला गेलो. त्यांच्या घरापासून 4-5 फूट अंतरावरच गावातली 8-10 मंडळी एकत्र उभं राहून चर्चा करत होती. मी त्यांना म्हटलं की, 'काका मला गावातील परिस्थिती काही योग्य वाटत नाही आहे. तुम्ही गावकरी लोकांना समजावून सांगा ते चेहऱ्याला मास्क किंवा रुमाल ही बांधत नाहीत.' पोलीस पाटलांकडून मला उत्तर असं मिळालं की, गावातील लोक ऐकतच नाहीत. 'तुम्ही पोलिसांना याबाबतीत माहिती द्यायला हवी', असं मी सुचवलं.  त्यांनी सांगितलं की, 'मी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनला माहिती दिली, पण पोलीस कर्मचारी कमी असल्यामुळे आम्ही पाठवू शकत नाही तर तुम्हीच गावातील लोकांना समजावून सांगा कुणी ऐकलं नाही तर आम्हाला सांगा... असं उत्तर मिळालं.' अजूनही गावात कुणी पोलीस कर्मचारी फिरताना वगैरे दिसला नाही किंवा पोलीस आल्याचा त्याच्या गाडीचा आवाज देखील आला नाही. मान्य करतो साहेब पोलीस कर्मचारी कमी आहेत. पण त्यासाठी इलाज शोधायला नको का? मला हे सगळं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवायचं आहे. माननीय मुख्यमंत्रीसाहेब, गावातली परिस्थिती गंभीर आहे, प्लीज काहीतरी करा. मी खेडे गावातील एक सामान्य नागरिक आहे. माहीत नाही माझा हा लेख तुमच्यापर्यंत पोहोचेल की नाही! (#21दिवस या सीरिजमधून आम्ही अशाच गावा-शहरांमधली घराघरातली परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. तुम्हीही यात सहभागी होऊ शकता.) Disclaimer हा लेख सर्वस्वी वाचक-लेखकाने दिलेल्या माहितीवर आधारित आहे. यातील माहितीची खातरजमा News18 Lokmat करू शकलेलं नाही. अन्य बातम्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ‘नेट’डाऊन, डिजिटल प्लॅटफॉर्मनींही घेतला मोठा निर्णय Coronavirus होऊ नये म्हणून काय करायचं? छोट्या घरात राहणाऱ्यांना पडलेत प्रश्न
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या