जालना, 27 नोव्हेंबर : कोरोनाच्या संकटातून सर्वचजण सावरत होते आणि व्यवहार आता कुठे पूर्णपणे सुरळीत झाले होते. त्याच दरम्यान कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने (Coronavirus new variant) जगभरात चिंता वाढवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आली आहेत. ओमिक्रॉन (Coronavirus new variant Omicron) हा खूपच घातक आणि झपाट्याने पसरणारा आहे. हेच पाहता महाराष्ट्राने आत्तापासूनच खबरदारी म्हणून पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
कोरोनाचा नवा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असून आपल्या देशात या व्हेरिएंटचा अजून एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र व्हेरिएंट फारच धोकादायक असेल तर आफ्रिकेतून महाराष्ट्रात होणारी विमान वाहतूक रद्द करा अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी जालन्यात दिलीय.
दक्षिण आफ्रिकेतील फ्लाईट्स रद्द करण्याची गरज
सध्या विमानतळावर बाहेरून येणाऱ्या रुग्णांचं मोनिटरींग होत असून स्वाईप टेस्टिंग आणि स्क्रिनिंग सुरू असून या व्हेरिएंटपासून राज्य सरकार खबरदारी घेत असल्याचे देखील आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. विमान प्रवासासाठी 72 तास आधीचे कोरोना टेस्टिंग प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आलं असून विमानतळावर कडक तपासणी केलं जातं आहे. तसेच क्वॉरंटाईन करण्याचा नियम करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणारी विमानं बंद करण्यासाठी मुंबई पालिका आयुक्तांच्या पत्रासह विनंती पत्र केंद्राला पाठवण्यात आलं असून केंद्राने अभ्यासपूर्ण निर्णय घ्यावा असंही राजेश टोपे म्हणाले.
वाचा : Omicron वर लस प्रभावी आहे का?, फायझरनं दिली महत्त्वाची माहिती
राज्याला अधिकार नसल्याने केंद्राकडे मागणी
ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्शवभूमीवर दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या फ्लाईट्स रद्द करण्याची गरज आहे. राज्याला या संदर्भात अधिकार नसल्याने केंद्राकडे आम्ही याबाबत मागणी देखील केलीय. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाश्यांची तपासणी करून योग्य ती काळजी घेतली घातली जात आहे असंही राजेश टोपे म्हणाले.
ओमिक्रॉन व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला असला तरी महाराष्ट्रात त्याचे तात्काळ परिणाम दिसण्याची शक्यता नाही. शाळा उघडण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून आरोग्य विभागाने NOC दिली आहे. मात्र उद्या सायंकाळी मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व विभागाची बैठक घेणार असून त्यात शाळा संदर्भात ही चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल अशी माहितीही राजेश टोपेंनी दिली.
वाचा : धाकधूक वाढली, SDM कॉलेजमध्ये एका आठवड्यात तब्बल 281 नवे कोरोनाबाधि
राज्यात पुन्हा निर्बंध?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात विविध प्रकल्पांचा आढावा घेणारी बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, पुण्यात परिस्थिती बरी आहे पण जागतिक पातळीवर नव्या प्रकारचा व्हायरसचा फैलाव होत आहे. त्याबद्दल फार वेगवेगळ्या प्रकारची मत आहेत. मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतील. काही निर्बंध पुन्हा आणावी लागतील असं त्या क्षेत्रातल्या मान्यवरांचे मत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Narendra modi, Rajesh tope