मुंबई, 7 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेच्या चिन्हाच्या मुद्द्यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात सुरु असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून कदाचित उद्या यावर अंतिम निकाल घेतला जाऊ शकतो. या घडामोडी आपापल्या ठिकाणी आता वेगाने घडताना दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने ही जागा खाली झाली आहे. लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर सहा महिन्यात संबंधित मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा नियम आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने उमेदवार जाहीर केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा उमेदवार या पोटनिवडणुकीत उभा राहणार नाही हे निश्चित आहे. पण शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चिन्हावरुन संघर्ष आहे. हे सगळं खरं असलं तरी शिवसेनेची अडचण वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा दर्शवण्याचं विधान केलं असलं तरी काँग्रेसमध्ये या मुद्द्यावरुन मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरुन नाना पटोले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मुद्द्यावरुन नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस पक्षात एकमत नाही, अशी माहिती नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना फोनवर दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे याच मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील यांच्यासोबत फोनवर चर्चा करणार आहेत, अशी देखील माहिती समोर आली आहे. ( शिवसेनेला आता फक्त पुढच्या 21 तासांची मुदत, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत प्रचंड घडामोडी ) या सगळ्या घडामोडींनंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे. कारण या पोटनिवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. पण मुंबईतील काँग्रेसचे नेते या मताशी सहमत नसल्याचं उघड झालं आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी अजून या मुद्द्यावर निर्णय झालेला नाही, असं मत मांडलं आहे. त्यामुळे अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या सगळ्या उलटसुलट चर्चांवर पडदा पाडण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या पक्षाध्यक्षांनी निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे याबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम नाही, अशी स्पष्ट प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. “अंधेरी पूर्व मतदारसंघ पोटनिवडणुकीबद्दल संभ्रम राहण्याचं काही कारण नाही. कारण आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की, आमचा शिवसेनेला पाठींबा राहणार आहे. आम्ही एकत्र निवडणूक लढू. एकत्र चर्चा करुनच हा निर्णय झाला आहे. आम्ही एकत्रच काम करत आहोत. अध्यक्षांनी बोलल्यानंतर बाकी इतर कुणी सांगण्याची आवश्यकताच नाही”, अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली. दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. “सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वेळ लागला. आता पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. हे सगळं करायला 100 दिवस लागली. पितृपक्ष आला म्हणून काम थांबलं असं अभिनव उदाहरण आम्हाला या काळात पाहायला मिळालं. अजूनही शेतकऱ्यांकरता त्यांची मदत पोहोचलेली नाही. शेतकरी अत्यंत अडचणीतून जात आहे. नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचं लक्ष नाही. दिल्लीच्या वारंवार फेऱ्या करताना त्यांच्या नाकेनऊ येत आहे. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होतो याची वाट पाहत आहेत. तर काही मंडळी सुप्रीम कोर्टाचा निकाल काय लागतो याची वाट पाहत आहेत. अशा पद्धतीने हे सरकार चालत आहे”, अशी टीका बाळासाहेब थोरातांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.