मुंबई, 31 जुलै : मुंबईत आज ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी ईडीने संजय राऊतांना ताब्यात घेतलं आहे. राऊतांची सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यांना कोणत्याही क्षणी अटक देखील होवू शकते. या सगळ्या घडामोडींदरम्यान मुंबईतून आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अस्लम शेख हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज आणि अस्लम शेख हे एकत्र देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर गेल्याची माहिती समोर आली आहे. या तीनही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि आर्थिक घोटाळ्याचे अनेकदा गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांच्याविरोधात आज सर्वात मोठी कारवाई होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात किरीट सोमय्या यांनी अस्लम शेख यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. सोमय्यांनी अस्लम शेख यांच्यावर थेट 200 कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. ( समुद्रात स्टुडिओचं बांधकाम, तब्बल 200 कोटींचा भ्रष्टाचार, किरीट सोमय्यांचा माजी मंत्र्यावर सर्वात मोठा बॉम्ब ) “अनिल परबांनी दापोलीत समुद्रात जसं रिसॉर्ट बांधलं तसंच मढमध्ये कोरोना काळात माजी मंत्री अस्लम शेख यांच्या आशीर्वादानं मोठमोठी बांधकामे उभी राहिली आहेत. समुद्रात सर्व नियमांचं उल्लंघन करुन अशी बांधकामे केली जात आहेत. जवळपास 200 कोटींचा घोटाळा या ठिकाणी आहे. थेट समुद्रात स्टुडिओ आणि इतर बांधकामे केली जात आहेत”, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे अस्लम शेख यांच्या पाठिमागे देखील ईडीचा ससेमिरा लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होता. या दरम्यान आज ईडीकडून संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई झाली आणि त्यानंतर अस्लम शेख हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.