प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी नवी दिल्ली, 15 मे : काँग्रेसच्या हायकमांडने (Congress High Command) आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्ष पुन्हा उभारीने उभा राहावा म्हणून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आता राजकीय घराणेशाहीला फाटा देणारा निर्णय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी घेतला आहे. काँग्रेसचं आज चिंतन शिबिर (Congress Chintan Shibir) आयोजित करण्यात आलं होतं. या चिंतन शिबिरात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी एक म्हणजे काँग्रेस यापुढे एका कुटुंबाला एकच तिकीट (One Family One Ticket) देईल. याचाच अर्थ आगामी कोणत्याही निवडणुकी असल्या तर काँग्रेस पक्ष एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला निवडणुकीचं तिकीट देईल. पक्षात वर्षोनुवर्षांपासून काम करणारे इतर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांनादेखील संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयाने महाराष्ट्रातील राजकीय कुटुंबाचे (Maharashtra Congress political families) काय होणार? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. काँग्रेसच्या चिंतन शिबिरात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल. दुसर्या सदस्याने पक्षाला 5 वर्षे दिली असतील, म्हणजे पक्षासाठी सक्रिय काम केले असेल तरच तिकीट मिळेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक राजकीय कुटुंब आहेत. त्यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं कुटुंब. विलासराव यांचे अमित देशमुख आणि धीरज देशमुख दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत. यापैकी अमित हे महाराष्ट्राच्या वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतीक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. ( मनसेतला अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, वसंत मोरे भडकले; थेट वरिष्ठांकडे तक्रार ) महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं पक्षासाठी मोठं काम आहे. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे यादेखील तितक्याच प्रभावशाली आहेत. त्यानंतर अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण हे देखील राजकारणात सक्रिय आहेत. तसेच सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील, बाळु धानोरकर आणि प्रतिभा धानोरकर, विश्वजीत कदम आणि मोहन कदम, सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे, पी एन पाटील सडोलीकर आणि राजेश पाटील अशी अनेक नावं आहेत. आता या राजकीय कुटुंबाचं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काँग्रेस चिंतन शिबिरात कार्यकारिणीने आज घेतलेले निर्णय: 1) काँग्रेस संघटनेत एकाच पदावर एक टर्म (5 वर्षे) पूर्ण केल्यानंतर पुन्हा लगेच संधी मिळणार नाही. 3 वर्षांचा कुलिंग ऑफ कालावधी असेल आणि त्यानंतर या पदावर पुन्हा नियुक्ती करता येईल. 2) प्रत्येक राज्यात राजकीय व्यवहार समिती असेल. 3) शेतीला उद्योगाचा दर्जा दिला जाईल. 4) MSP हमी कायदा करेल. एमएसपीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांची पिके खरेदी करता येणार नाहीत. 5) संघटनेतील 50 टक्के पदे 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या नेत्यांना दिली जातील. 6) CWC मध्ये एक उपसमिती देखील स्थापन केली जाईल, जी सर्व प्रकरणांवर काँग्रेस अध्यक्षांना मत देईल. 7) एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल, दुसर्या सदस्याने पक्षाला 5 वर्षे दिली असतील, म्हणजे पक्षासाठी सक्रिय काम केले असेल तरच तिकीट मिळेल. 8) काँग्रेसमध्ये राजकीय घडामोडी समिती स्थापन केली जाईल, ज्याचे सदस्य CWC मधून घेतले जातील. ही समिती संसदीय मंडळाप्रमाणे काम करेल ज्याची मागणी G23 नेत्यांनी केली होती. म्हणजे महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर अध्यक्ष या समितीचे मत घेतील. 9) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटना, ओबीसी/एससी/एसटी महिला आणि अल्पसंख्याकांमध्ये 50 टक्के आरक्षण दिले जाईल. 10) शेतकरी कर्जमाफीसाठी देशव्यापी योजना जाहीर केली जाईल. 11) वीजबिल माफ आणि शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली जाईल. 12) देशातील अंतर्गत निवडणुका आणि निवडणुकांसाठी पक्षात कायमस्वरूपी विभाग तयार करण्यात येणार आहे. 13) आम्ही सत्तेत आल्यास ईव्हीएमवर बंदी घालू आणि पुन्हा मतपत्रिकेवर निवडणुका घेऊ.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.