जितेंद्र आव्हाडांच्या इंदिरा गांधी टीकेवर वाद पेटला, अशोक चव्हाण भडकले

जितेंद्र आव्हाडांच्या इंदिरा गांधी टीकेवर वाद पेटला, अशोक चव्हाण भडकले

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा थेट इशारा दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 30 जानेवारी : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशातील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. बीड शहरातील संविधान बचाव रॅलीत ते बोलत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर आता सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे.

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून घटकपक्षांकडून एकमेकांच्या प्रिय नेत्यांबाबत वादग्रस्त विधानं सुरूच आहेत. राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. मग त्यानंतर करीम लाला इंदिरा गांधींना भेटायचा असं संजय राऊत म्हणाले. आणि आता आव्हाडांनी इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत याचं चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा थेट इशारा दिला आहे.

अशोक चव्हाण यांनी ट्वीट शेअर करत लिहिलं की, 'देशाची एकता व अखंडतेसाठी आयुष्य पणाला लावणार्‍या इंदिराजी गांधी आजही संपूर्ण जगात कणखरता व कर्तबगारीसाठी परिचित आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी वेळीच खुलासा केला ते बरे झाले. तरी मी यासंदर्भात एक नक्कीच सांगेन की, कोणीही आमच्या नेत्यांचा अनादर केला तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल.'

यावर आता जितेंद्र आव्हाड काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, बीडमध्ये बुधवारी संविधान बचाव रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत जितेंद्र आव्हाड यांनी भाषण केलं. यावेळी बोलताना, इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुणी बोलण्यास तयार नव्हतं, पण अहमदाबाद आणि पाटणाच्या विद्यार्थ्यांनी आवाज उठवला. तेव्हा जयप्रकाश नारायण यांचे आंदोलन सुरू झाले आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला हा इतिहास परत एकदा महाराष्ट्रात आणि देशात घडेल. यांचे श्रेय जेएनयू, हैद्राबाद युनिवर्सिटीला द्यावा लागेल, असं आव्हाड म्हणाले.

तसंच, विद्यार्थी बिनदिक्कतपणे बाहेर पडत आहेत. कायदा समजून सांगतं आवज देत आहेत, आज संख्या कमी दिसत आहे. हळू हळू वाढेल आणि विद्यार्थी देशाला दुसरी आजादी मिळवून देतील, असा विश्वासही जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात मोदी शहा हे जेएनयू ला घाबरतात, कारण सळसळते रक्त आणि बुद्धीमान लोकांना हे सरकार घाबरते म्हणून ते नेस्ट नाबूत करण्यासाठी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आला पण जेव्हा विद्यार्थी आणि महिला आंदोलनात सहभागी होतात. तेव्हा होणारी क्रांती कोणीच रोखू शकत नाही. इंदिरा गांधीचा पराभव देखील याचं विद्यार्थ्यांनी केला होता. हा देशाचा इतिहास आहे, असंही ते म्हणाले होते.

First published: January 30, 2020, 9:20 AM IST

ताज्या बातम्या