तुषार शेटे, प्रतिनिधी शहापूर, 25 जुलै : ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यातील आदिवासी बहुल आणि दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या पिवळी ग्रामपंचायत हद्दीतील हेदुपाडा या 20 ते 25 घरांच्या वस्तीवरील विद्यार्थ्यांना भर पावसाळ्यात शाळेत जाण्यासाठी जीर्ण झालेला लाकडी साकव पार करुन जीवघेणा प्रवास करावा लागत होता. याबाबत न्यूज18 लोकमतने वृत्त प्रसिद्ध केलं होतं. या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने तातडीने लोखंडी पूल उभारण्याचे आदेश दिले होते. अवघ्या 5 दिवसांमध्ये हा पूल उभारण्यात आला. आज या पुलाचे विद्यार्थ्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. शहापूर तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या जवळ पिवळी ग्रामपंचायतीमध्ये छोटासा आदिवासी पाडा आहे. या पाड्यात 19 घरं असून जवळपास प्रत्येक घरातलं मूल शाळेत जातं. रताळेपाड्यात 1 ते 4 थी पर्यंतची शाळा भरते तर पिवळी पाड्यावर 5 ते 12 पर्यंतचे वर्ग भरतात. मात्र, पावसाळ्यात विद्यार्थ्यांचं अनेकदा नुकसान होतं. कारण या दोन्ही पाड्यांना जोडणारा मुख्य रस्ता नाही. त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना लाकडी साकवावारून शाळेत जावं लागतं. यापूर्वी 2 वेळा हा साकव वाहूनही गेला होता. मात्र, विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी स्वत:च श्रमदानातून साकव तयार केला.
मात्र जेव्हा जोरदार पाऊस होतो. तेव्हा विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. याबद्दलचे वृत्त न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या गंभीर समस्येची बाब राज्याचे संवेदनशील मृख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास येताच तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी आणि तालुका प्रशासन यांना आदेश देऊन या ठिकाणी मजबूत लोखंडी पुलाची उभारणी करण्याचे आदेश दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा संवेदनशीलपणा, शहापूरमध्ये 5 दिवसांत उभारला पूल, विद्यार्थ्यांच्या हस्ते झालं लोकार्पण, यावेळी विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे समन्वयक मंगेश चिवटे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा आदी उपस्थितीत होते. pic.twitter.com/ALRDAAKjjq
— News18Lokmat (@News18lokmat) July 25, 2023
प्रशासनाने पाच दिवसात हा पुलाचे बांधकाम पुर्ण करुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा मुख्यमंत्री आरोग्य कक्षाचे समन्वयक मंगेश चिवटे, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या उपस्थितीत शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या शुभहस्ते आज या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी शालेय विद्यार्थिंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. तर यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. (वर्धेकरांचा लाडका पक्षी कोणता आहे माहितीये का? रंजक ठरली होती निवडणूक) तर उपस्थितांनी जि.प. शाळेला भेट देवून तेथील मध्यान्य भोजन आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांची विचारपुस केली. यावेळी जि.प.कृषी सभापती संजय निमसे, जि.प.सदस्य निखिल बरोरा, तहसिलदार कोमल ठाकुर, गट विकास आधिकारी भास्कर रेंगडे,गट शिक्षण आधिकारी बी.टी चव्हाण, बांधकाम उपअभियंता खैरनार,स्थानिक सरपंच, उपसरपंच सह शिक्षक मुख्याधापक व पत्रकार प्रशांत गडगे, दिनेश पाचघरे, प्रकाश जाधव सह अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.