मुंबई, 9 सप्टेंबर : संपूर्ण राज्यात यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर आज अनंत चतुर्दशीला गणरायाला भक्तीभावाने निरोप देण्यात आला. गणेशोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेकडो गणेश मंडळांना भेट दिल्या. तसेच अनेक माध्यमांच्या ऑफिसमध्ये विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचेही त्यांनी दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आज दहीसरमध्ये गणपती दर्शनाला गेले असताना मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - गणेशोत्सव दोन वर्षांनी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात, जल्लोषात साजरा होताना आपण पाहत आहोत. याचा समाधान आहे आनंद आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर, येणारे उत्सव जल्लोषात, उत्साहात, धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय देवेंद्रजी आणि मी घेतला. कारण गेले दोन वर्ष जे नैराश्य आणि नकारात्मकता पसरली होती त्यामध्ये बदल झाला पाहिजे. आणि सरकार बदललं आहे तर सगळंच बदलायला पाहिजे. त्याची प्रचिती तुम्ही पाहतच आहात. गोविंदा, दहीहंडी आणि गणेशोत्सवही उत्साहात साजरा झाला. लोकं खूप खूश आहेत. निर्बंधमुक्त सण साजरा करताना मी पोलिसांनाही सांगितलं आहे, थोडं जास्तीचं सहकार्य लोकांना करा. कारण आपली संस्कृती, आपली परंपरा पुढे न्यायची आहे. आपण निर्बंध लादत गेलो तर हे उत्सव कमी होतील. म्हणून आम्ही सांगितलं One Window Clearance, सर्वांना परवानग्या द्या. आता येणारा नवरात्रोत्सवसुद्धा आपल्याला जोरात साजरा करायचा आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. परवा मी पुण्यात गेलो होतो. प्रचंड पाऊस असतानाही लोकं रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत होते. मलादेखील राहावलं नाही. म्हणून मग मी सुद्धा पावसात त्यांच स्वागत स्विकारायला गेलो. तर लगेच टीका व्हायला लागली की फोटो काढायला मुख्यमंत्री….’, असे सांगत त्यांनी फोटो काढायलापण लोकं जवळ यायला लागतात ना, प्रेमाने त्यांना जवळ घ्यावं पण लागतं, फोटो काढायला असं कुणी कुणाच्याही बाजूला जात नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. हेही वाचा - पुण्याच्या या बाप्पाने केली कमाल, दोन विरोधक आले एकत्र; नेमकं काय घडलं? सरकार कुणाचं होतं आपल्याला माहिती आहे, तसंच ते चालवत कोण होतं हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळे गणराय त्यांना सद्बुद्धी न देवो, अशी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.