पुणे, 14 जानेवारी : नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांनी एबी फॉर्म हातात असताना देखील उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तांबे पिता-पुत्रांच्या या बंडानंतर काँग्रेस नेतृत्व आक्रमक झालं असून, तांबे यांना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं काँग्रेसने जाहीर केलं आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे हे भाजपाचा पाठिंबा घेणार का? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्यावर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं काय म्हटलं बावनकुळे यांनी? नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याचं काँग्रेसने या आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे तांबे हे भाजपाचा पाठिंबा घेणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना बावनकुळे यांनी म्हटलं की सत्यजित तांबे यांनी अद्याप भाजपकडे पाठिंबा मागितलेला नाही. पाठिंब्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर संसदीय बोर्ड निर्णय घेईल. कर्तृवान कार्यकर्त्यांना संधी देण्याची भाजपची नेहमीच भूमिका राहिली आहे. हेही वाचा : खैरेंना त्यांच्या पक्षात किंमत आहे का?, ‘त्या’ वक्तव्यावरून संदीपान भूमरेंचा खोचक टोला काँग्रेसला टोला दरम्यान यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला देखील जोरदार टोला लगावला आहे. आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. मविआमध्ये धुसफूस सुरू आहे. काँग्रेस हे बुडणारं जहाज आहे, त्यामुळे त्यात कोण कशाला बसेल? काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं असं बवनकुळे यांनी म्हटलं आहे. तसेच जनतेचा कौल हा भाजप, शिवसेना युतीलाच असल्याचही त्यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.