मुंबई, 14 ऑगस्ट : राज्य मंत्रिमंडळाचं अखेर खातवाटप जाहीर झालं आहे. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. दरम्यान चंद्रकांत पाटलांना मात्र उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य यावर आनंद मानावा लागणार आहे. त्यात काँग्रेसमधून काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांना मात्र महत्त्वाचं असं महसूल मंत्रिपद मिळालं आहे. चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद हवं आहे. त्यासाठी ते आग्रही होते. पण ते खातं त्यांच्याऐवजी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलं. त्यामुळे नेहमीप्रमाणे येथेही भाजपचं धक्कातंत्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रासाठी सर्वात मोठी बातमी, अखेर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर चंद्रकांत पाटील हे युती सरकारच्या काळात महसूल मंत्री होते. त्यामुळे त्यांना यावेळी सुद्धा महसूल विभागाचं मंत्रीपद हवं होतं. त्यासाठी ते आग्रही होते. पण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महसूल विभागाची जबाबदारी ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली. या मंत्रिमंडळ विस्तारात गुजरात पॅटर्न अवलंबला जाणार, अशी चर्चा होती. त्यानुसार नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. पण अखेर काल चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम लागला. पण चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद मिळालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.