मुंबई, 17 सप्टेंबर : काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून धुसफूस असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं तेव्हा काँग्रेसमधील तब्बल 10 आमदारांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जावून मिळणार, अशी चर्चा होती. पण तसं काही घडलं नाही. पण तरीही काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरुच होती. विधान परिषदेच्या निवडणुकीत जवळपास सात आमदारांनी आपल्या उमेदवाराला मतदान न करता क्रॉस वोटिंग केलं. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला, अशी माहिती समोर आली होती. हंडोरे यांचा हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय. काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी आमदार भाई जगताप यांच्याऐवजी चंद्रकांत हंडोरे यांच्यावर सोपवण्याच्या तयारीत आहे. याबाबत हंडोरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केलंय. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवरही कारवाई होणार का? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं.
तीन महिन्यांपूर्वी विधान परिषदेच्या 20 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणी दोषी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर विश्वादर्शकाच्या ठरावाच्या वेळी देखील काँग्रेसचे अनेक आमदार विधानसभेच्या सभागृहात अनुपस्थित होते. त्यावरुनही कारवाईची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार चौकशीही झाली होती. पण कारवाई झाली तर त्याचा पक्षाला प्रचंड मोठा फटका बसू शकतो, अशी काँग्रेसला भीती होती. त्यामुळे काँग्रेसच्या हायकमांडने संबंधित आमदारांवर अद्यापही कारवाई केलेली नाही. पण या आमदारांवर भविष्यात कदाचित कारवाई देखील होऊ शकते. कारण चंद्रकांत हंडोरे यांनी त्याबाबतचं सूचक विधान केलं आहे.
"विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी माझ्या विरोधात मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल, असा मला विश्वास आहे", अशी प्रतिक्रिया चंद्रकांत हंडोरे यांनी दिली.
यावेळी चंद्रकांत यांनी मुंबई अध्यक्षपदाबद्दलही महत्त्वाचं विधान केलं. "काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मला मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तर मी ती स्वीकारेन. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा अजेंडा आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सत्ता मिळवून देण्याचा निश्चय महाराष्ट्रातील सर्व नेत्यांनी केला आहे", अशी प्रतिक्रिया चंद्रकांत हंडोरे यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonia gandhi, काँग्रेस