नवी दिल्ली, 18 एप्रिल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यांच्या या अल्टिमेटम नंतर त्यांना अनेक संघटनांकडून धमक्या येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तरीही राज ठाकरे आपल्या मशिदींवरील भोंगे काढण्याबाबतच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी कालच्या पुण्यातील पत्रकार परिषदेतही तीच भूमिका कायम ठेवली. तसेच आपण अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती दिली. या सगळ्या घडामोडी पाहता केंद्रीय गृहमंत्रालयाने राज ठाकरे यांचा सुरक्षेचा विचार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या आधी त्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवली जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या आधी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे अयोध्येला जाणार तेव्हा उत्तर प्रदेश सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येला मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना आधी राज्य सरकारकडून Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली जात होती. पण काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली होती. त्यामध्ये राज ठाकरे यांचा देखील समावेश होता. राज्य सरकारने राज ठाकरेंची Z+ सुरक्षा हटवून त्यांना Y+ दर्जाची सुरक्षा दिली होती. राज्य सरकारच्या या निर्णयाची प्रचंड चर्चा झाली होती. त्यानंतर आता थेट केंद्र सरकारनेच राज ठाकरे यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ( नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशावर शिक्कामोर्तब, धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात राज्य सरकारनं घेतला निर्णय ) मनसे-भाजप एकत्र येणार? राज ठाकरे यांनी आता हिंदुत्वाचा मुद्दा हाती धरला आहे. तसेच भाजपदेखील हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरुनच देशभरात पसरलेला पक्ष आहे. या दोन्ही पक्षांची हिंदुत्ववाद्याच्या मुद्द्यावरुन एकजुट होते का? ते येणारा काळ ठरवेल. पण त्याआधी घडणाऱ्या घटना या त्यासाठी सकारात्मक असल्याच्या दिशेला आहेत. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटी झाल्या होत्या. याशिवाय मध्यंतरी भाजप नेते आशिष शेलार आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटी हे येत्या काळात नवं राजकीय समीकरण तर घेऊन येणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उपस्थित होतोय. कारण एकामागेएक अशा घटना अगदी तशाच साजेशा घडताना दिसत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.