मुंबई, 2 ऑगस्ट : शिवसेनेवरील संकट काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. विशेष म्हणजे पुण्यात शिवसैनिकांचा प्रचंड मोठा राडा झाला. हिदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेत आज मोठी फूट पडली आहे. याच शिवसेनेचे माजी मंत्री असलेले उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात शिवसैनिकांनी हल्ला केल्याची बातमी ताजी असताना मुंबईतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केदार दिघे यांना नुकतीच ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. त्यानंतर आज त्यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्यावर बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात केदार दिघेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. केदार दिघे यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात केदार दिघे यांचा काय सहभाग आहे याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण दिघेंनी धमकी दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. ( ‘एकाच्या हातात दगड, दुसऱ्याच्या हाती सळई, समोरुन मला शिवीगाळ’, उदय सामंतांनी सांगितला हल्ल्याचा थरार ) आनंद दिघेंच्या पुतण्यावर उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेवर मोठं संकट उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे मुख्य शिवसेनेची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर रोखठोकपणे मांडणारे संजय राऊत यांच्यापाठीमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने त्यांना पत्राचाळ घोटाळ्यांच्या आरोपाप्रकरणी ताब्यातही घेतलं आहे. या कठीण काळात उद्धव ठाकरेंनी संयम सोडलेला नाही. आपले जवळच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडल्यानंतरही ते लढण्याच्या भूमिकेत दिसत आहेत. विशेष म्हणजे ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दिवंगत शिवसेनेचे नेते धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्याईमुळेच ठाण्यात शिवसेनेचा पाया भक्कम झाला. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे कामे झाली. पण आता परिस्थिती वेगळी आहे. ठाण्यातील सर्व नगरसेवकांचा शिंदेंना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत आनंद दिघे यांच्यासोबत रक्ताचं नातं असलेले केदार दिघे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली आहे. उद्धव ठाकरे यांची ही आताची खूप विचारपूर्वक आणि महत्त्वाची राजकीय खेळी मानली जात होती. पण त्यानंतर आज दिघेंच्या विरोधात धक्कादायक माहिती समोर आली आहे. केदार दिघे आणि उद्धव ठाकरे यांचं आतापर्यंतचं नातं पाहिलं तर फार तितकं जवळचं बघायला मिळालं नव्हतं. केदार दिघे हे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांवर नाराज आहेत, अशा बातम्या मधल्या काळात समोर आल्या होत्या. कारण त्यांची फारसी दखल घेतली जात नव्हती. पण केदार दिघे यांनी आपल्या पक्षाप्रती निष्ठा ठेवली. त्यांनी कधीच शिवसेना पक्षप्रमुखांविरोधात टोकाची टीका केली नाही. त्यांनी काहीवेळा आपल्यावर अन्याय होत असल्यासारखे विधान उद्विग्नतेतून व्यक्त केले. पण त्यांनी कधीच शिवसेनेवर टीका केली नाही. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर केदार दिघे यांनी त्यांच्या बंडाला विरोध केला. शिंदेंनी केलेलं बंड चुकीचं आहे, अशी रोखठोक भूमिका त्यांनी घेतली. एकनाथ शिंदे एकीकडे ठाकरे कुटुंबिय आणि शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांच्या भेटीगाठी घेत असताना केदार दिघे यांनी घेतलेल्या भूमिकेकडे अनेकांचं लक्ष गेलं. कारण केदार हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते. विशेष म्हणजे त्यांच्या या भूमिकेची दखल स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यामुळे त्यांनी केदार दिघेंना ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.