सागर कुलकर्णी, मुंबई, 24 डिसेंबर : राज्यात महाविकास आघाडीच्या खाते वाटपात अजून एक चांगलं खातं मिळावं यासाठी काँग्रेस पक्षाकडून अजूनही दबावतंत्र वापरलं जाण्याची शक्यता आहे. ग्रामविकास, सहकार -पणन, जलसंपदा, कृषी यापैकी एक खातं शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून मिळावं, यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या खातेवाटपात काँग्रेसला सध्या मिळालेल्या वाट्यात दिल्लीतील नेते फार समाधानी नाहीत. त्यामुळे अजून एक खाते मिळावे यासाठी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मात्र काँग्रेसकडून त्यांच्या पक्षातील मंत्र्यांची अंतिम यादी अद्याप आली नसल्याने हा मंत्रिमंडळ विस्तार रखडला असल्याचं दिसत आहे. त्यातच आता ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करताना खात्याचा वाटपात अदलाबदल करताना एक अजून चांगलं खातं मिळावे यासाठी काँग्रेस दबाव वाढविण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर-उद्धव ठाकरेंची भेट होणार, ‘या’ मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता दरम्यान, महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. 30 डिसेंबरला दुपारी 1 वाजता शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षातील मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री असतील, तर काँग्रेसच्या वाट्याला 10 मंत्रिपदे येणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून कुणाला मिळणार संधी? मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसकडून अशोक चव्हाण, विजय वड्डेटीवार, अमित देशमुख, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांना संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवायची की पृथ्वीराज चव्हाण यांना नेमायचे याबाबत अजून अंतिम निर्णय येणं बाकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







