नवी दिल्ली, 17 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेना संघर्ष आता चांगलाच पेटला आहे. कंगनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन कोण वार करतेय हे सगळ्यांना ठाऊक आहे, असा टोला लगावत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी भाजपवर तोंडसुख घेतलं आहे. कंगना रणौत हिची काही तक्रार असेल तर तिनं थेठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यावी. पण विनाकारण कोणाच्या हातामधील हत्यार होऊ नये, असंही असलम शेख यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा.. 'भाभीजीचे पापड खाऊन कोरोना रुग्ण बरे झाले का?' संजय राऊतांची टीका
पालकमंत्री असलम शेख यांनी 'News18 लोकमत' सांगितलं की, कंगना हिला हाताशी घेऊन कोण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे, हे संगळ्याना माहित आहे. कंगनाला राजकारणात यायची नाही, हे देखील तिनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे कुठल्याही वक्तव्य करण्यापूर्वी विचार करावा, असा सल्ला देखील पालकमंत्री असलम शेख यांनी कंगनाला दिला आहे.
जया बच्चन यांची पाठराखण करत शिवसेनेनं कंगनाला पुन्हा फटकारलं...
'सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेइमानी ठरली तरी चालेल. 'सब घोडे बारा टके' असे सरसकट म्हणणे हा सच्च्या कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, ' असं म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण करत कंगना राणावतवर पुन्हा एकदा पलटवार केला आहे.
हिंदुस्थानची सिनेसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ आहे असा दावा कोणीच करणार नाही, पण काही टिनपाट कलाकारांनी दावा केल्याप्रमाणे सिनेसृष्टीस ‘गटार’ही म्हणता येणार नाही. जया बच्चन यांनी संसदेत नेमकी हीच वेदना बोलून दाखवली आहे. 'ज्या लोकांनी सिनेसृष्टीत नाव, पैसा सर्वकाही कमावले ते आता या क्षेत्रास गटाराची उपमा देत आहेत. मी त्याच्याशी सहमत नाही.' जया बच्चन यांनी मांडलेली भूमिका जितकी महत्त्वाची तितकीच परखड आहे. हे लोक ज्या ताटात जेवतात त्याचीच बेइमानी करतात. अशा खाल्ल्या मिठास न जागणाऱ्या लोकांवर जया बच्चन यांनी हल्ला केला आहे.' असं म्हणत सेनेनं पुन्हा एकदा कंगनावर निशाणा साधला आहे.
'सिनेसृष्टीची यथेच्छ बदनामी आणि धुलाई सुरू असताना एरवी तांडव करणारे भलेभले पांडव तोंडात मिठाची गुळणी घेऊन गप्प बसले आहेत. जणू ते अज्ञात दहशतीखाली जगत आहेत किंवा कोणीतरी त्यांचे वागणे, बोलणे पडद्यामागून नियंत्रित करीत आहे. पडद्यावर शूर, लढवय्यांच्या भूमिका करून वाहवा मिळविणारे अचाट-अफाट कलावंतही मनाने आणि विचाराने कुलूपबंद होऊन पडले आहेत. अशा वेळी बच्चन यांची बिजली कडाडली आहे. मनोरंजन उद्योग रोज पाच लाख लोकांना सरळसोट रोजगार देतो. सध्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ‘लाइट, कॅमेरा, ऍक्शन’ बंद असताना लोकांचे लक्ष मूळ प्रश्नांपासून हटवण्यासाठी आम्हाला (म्हणजे बॉलीवूडला) सोशल मीडियावर बदनाम केले जात आहे, असे जया बच्चन यांनी सांगितले आहे. काही नट-नट्या म्हणजे संपूर्ण बॉलीवूड नव्हे, पण त्यातलेच काहीजण ज्या बेतालपणे वक्तव्ये करीत आहेत तो सर्वच प्रकार घृणास्पद आहे.'
हेही वाचा...
'सिनेसृष्टीतील यच्चयावत सगळे कलाकार किंवा तंत्रज्ञ हे जणू ‘ड्रग्ज’च्या जाळय़ात अडकले आहेत, चोवीस तास गांजा, चिलमीचे झुरके मारीत दिवस ढकलत आहेत, असे सरसकट विधान करणाऱ्यांची ‘डोपिंग’ टेस्ट व्हायला हवी. कारण यापैकी बहुतेकांच्या बाबतीत खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.' असा टोलाही कंगनाला लगावला.