अर्जेरिया शरदचंद्रजी : शरद पवारांचं नाव सह्याद्रीतल्या एका वनस्पतीला प्रदान

अर्जेरिया शरदचंद्रजी : शरद पवारांचं नाव सह्याद्रीतल्या एका वनस्पतीला प्रदान

शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील अफाट कार्याचा गौरव दोन तरुण वनस्पती शास्त्रज्ञांनी केला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधलेल्या एका नव्या वनस्पतीला या शास्त्रज्ञांनी थेट पवारांचं नाव दिलंय. या वनस्पतीचे नामकरण 'अर्जेरिया शरदचंद्रची' असं करण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 1 एप्रिल : शरद पवार हे राज्याच्याच नव्हे देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव आहे. विशेषतः कृषी क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांचं नेहमीच कौतुक केलं जातं. त्यांच्या कृषी क्षेत्रातील अशाच अफाट कार्याचा गौरव दोन तरुण वनस्पती शास्त्रज्ञांनी केला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत शोधलेल्या एका नव्या वनस्पतीला या शास्त्रज्ञांनी थेट शरद पवारांचं नाव दिलंय. या वनस्पतीचे नामकरण 'अर्जेरिया शरदचंद्रची' असं करण्यात आलं आहे.

कोल्हापुरातील डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी 'अर्जेरिया शरदचंद्रची' या नव्या वनस्पतीचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या पर्वत रागांमध्ये अनेकवर्ष संशोधन करून त्यांनी ही वनस्पती शोधली आहे. ही वनस्पती गारवेल कुळातली असल्याची माहिती या वनस्पती शास्त्रज्ञांनी दिलीय. डॉ. विनोद शिंपले हे अशा प्रकारच्या संशोधनासाठी जगविख्यात असून त्यांनी आतापर्यंत अशाप्रकारच्या पाच वनस्पतींचा शोध लावला आहे.

सुप्रिया सुळेंचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी यासाठी दोन्ही वनस्पती शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत. या दोन्ही संशोधकांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र हे आपले कुटुंब आहे असं आदरणीय साहेब मानतात. असा आदर आणि सन्मान केवळ कुटुंबातच होऊ शकतो. या दोन्ही संशोधकांनी नव्या वनस्पतीचे संशोधन साहेबांच्या नावे समर्पित केले. याचा मला नितांत आदर आहे, असं ट्वीट सुळे यांनी केलं आहे.

अशी आहे वनस्पती

'अर्जेरिया शरदचंद्रची' या नव्या वनस्पतीच्या संदर्भातील संशोधन कालिकत विद्यापीठाच्या रिडीया या आंतरराष्ट्रीय विज्ञान ग्रंथातून प्रकाशितही केले आहे. या वनस्पतीला जुलै ते सप्टेंबर दरम्यान पिवळ्या रंगांची फुलं येतात. तसेच ऑक्टोबर- डिसेंबर दरम्यान फळं लागतात. ही वनस्पती प्रामुख्याने आशिया खंडात सापडते अशी माहिती डॉ. विनोद शिंपले आणि डॉ. प्रमोद लावंड यांनी दिलीय. या दोन्ही वनस्पती शास्त्रज्ञांमा 2016 मध्ये सर्वप्रथम ही वनस्पती आढळली होती. त्यानंतर त्यांनी तिच्यावर संशोधन केले. तीन वर्षांच्या संशोधन काळात जगात इतर कुठेही अशा प्रकारच्या शोधाची माहिती मिळाली नाही, तर संशोधक त्या वनस्पतीला नाव देऊ शकतो. त्यामुळे या शास्त्रज्ञांना हा अधिकार मिळाला आणि त्यांनी शरद पवार यांचं म्हणजेच 'अर्जेरिया शरदचंद्रची' असं नाव या वनस्पतीला दिलं.

Published by: News18 Desk
First published: April 1, 2021, 5:21 PM IST

ताज्या बातम्या