रत्नागिरी, 28 फेब्रुवारी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील तळे-शिगवण वाडी या भागात रात्रीच्या वेळी रेशन धान्य दुकानातून रॉकेलचा होणार काळाबाजार ग्रामस्थांनीच स्टिंग ऑपरेशन करून उघड केला आहे. तीन ते चार महिने रेशनधान्य दुकानदार रॉकेल ग्रामस्थांना देत नाही, ग्रामस्थांनी विचारणा केली असता टाळाटाळ करून त्यांना शिवीगाळ केली जाते. काही ग्रामस्थांनी या प्रकरणामुळे त्या रेशन धान्य दुकानावर करडी नजर ठेवली आणि रॉकेल एका खासगी गाडीत भरून काळ्याबाजाराने विकत असताना व्हिडीओ ग्रामस्थांनीच आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये रेकॉर्ड केला.
कॅमेरामध्ये संबंधित दुकानातून रॉकेलचा काळाबाजार होत असल्याचं रेकॉर्डिंग करताना त्या दुकानदाराने ग्रामस्थांना शिवीगाळ देखील केली, काय करायचंय ते करा असं बोलून तो निघून देखील गेला. याबाबत तळे गावातील ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयात येऊन तक्रार दाखल केली असून या दुकानदारावर कारवाई झाली नाही, तर उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
35 ते 40 ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयात जावून तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना या बाबत निवेदन दिलं आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तहसीलदार कार्यालयासमोर संपूर्ण गाव उपोषणाला बसेल, असा इशारा देखील यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, खेडमध्ये ग्रामीण भागात रेशनधान्य घोटाळा, रॉकेल घोटाळा उघड होण्याची ही तिसरी वेळ आहे. या आधी देखील आंबवली विभागात मृत झालेल्या ग्रामस्थांच्या नावे शेकडो किलो धान्य विकण्यात आलं होतं. त्यांच्या खोट्या सह्या करण्यात आल्या होत्या. तेथील ग्रामस्थांनी देखील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून ही बाब उजेडात आणली होती.
खेड तहसीलदार कार्यालयातील पुरवठा विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ग्रामस्थांनी, पुरवठा विभाग अशा लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण होतं न होतं, तोच आता तळे विभागात रेशन धान्य दुकानात रॉकेलचा काळा बाजार कसा चालतो हे ग्रामस्थांनी स्टिंग ऑपरेशन करून उजेडात आणल्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. आता जिल्हाधिकारी यासंदर्भात काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.