मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा भाजपचा डाव फसला, 4 सदस्यही फुटले!

राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा भाजपचा डाव फसला, 4 सदस्यही फुटले!

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी संयुक्तपणे सत्तेत असताना इथं माञ, वेगळंच राजकीय समिकरण तयार झालं.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी संयुक्तपणे सत्तेत असताना इथं माञ, वेगळंच राजकीय समिकरण तयार झालं.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी संयुक्तपणे सत्तेत असताना इथं माञ, वेगळंच राजकीय समिकरण तयार झालं.

गडचिरोली, 03 जानेवारी : काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. परंतु, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी, काँग्रेस संयुक्तपणे सत्तेत असताना गडचिरोलीत आज जिल्हा परिषदेसाठी वेगळच चिञ तयार झालं.

51 सदस्य असलेल्या गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणाऱ्या भाजपचा डाव फसला. अध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार तर उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे मनोहर पाटील पोरेटी यांची निवड झाली. विशेष म्हणजे, भाजपच्या चार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याने आपल्याच उमेदवाराच्या विरोधात मतदान केले.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेत आहे. मात्र, गडचिरोली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी भाजपबरोबर तर काँग्रेस आदिवासी विद्यार्थी संघटनेबरोबर गेल्याने वेगळे समीकरण तयार होवून निवडणुकीत चुरस निर्माण झाली.

अध्यक्षपदासाठी आविसचे अजय कंकडालवार यांनी नामांकन दाखल केलं. तर भाजपनेही आपल्याकडे मॅजिक फिगर असल्याचं सांगत नामदेव सोनटक्के यांचे नामांकन दाखल केलं. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपकडून नाना नाकाडे, युधिष्टिर विश्वास यांनी तर काँग्रेसतर्फे मनोहर पोरेटी, राम मेश्राम यांनी नामांकन भरले. परंतु, नाना नाकाडे आणि राम मेश्राम यांनी नामांकन मागे घेतले.

सभागृहात हात उंचावून मतदानाला सुरुवात झाली तेव्हा भाजपच्या चार सदस्यांनी तर राष्ट्रवादीचे जगन्नाथ पाटील बोरकुटे यांनी अजय कंकडालवार यांच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे अध्यक्षपदी अजय कंकडालवार  22 विरुद्ध 29 मतांनी विजयी झाले. तर मनोहर पाटील पोरेटी यांची 22 विरुद्ध 29 मतांनी उपाध्यक्षपदी निवड झाली.

गडचिरोली जिल्हा परिषदेत सध्याचे पक्षीय बलाबल

भाजप - 20

काँग्रेस - 15

आदिवासी विद्यार्थी संघ -  7

राष्ट्रवादी काँग्रेस - 5 

अपक्ष  -4

मागच्या वेळेस भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस-आदिवासी विद्यार्थी संघ अशी युती करून भाजपच्या योगिता भांडेकर तर उपाध्यक्षपदी आदिवासी विद्यार्थी संघाचे अजय कंकडालवार विराजमान झाले होते. यावेळेस अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं अनेकांनी फिल्डिंग लावली होती. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी संयुक्तपणे सत्तेत असताना इथं माञ, वेगळंच राजकीय समिकरण तयार झालं.

शिवसेनेच्या मदतीने भाजपने फडकावला झेंडा

तर दुसरीकडे,  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने आपला गड राखला आहे. शिवसेना आणि रयत क्रांतीच्या  मदतीने भाजपने सांगलीत आपला गड राखला आहे.

आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता कोरे यांनी  महाविकास आघाडीच्या उमेदवार कलावती गौरगोड यांचा 13 मतांनी पराभव करीत भाजपचा झेंडा फडकावला आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचेच शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांचा विजय झाला आहे.

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि रयत क्रांती भाजपसोबत गेल्याने सांगली जिल्हा परिषदेत भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्नं पाहणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं.

चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप सपाट!

दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली असून महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. या नव्या समिकरणामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आता संपुष्टात आली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले होते तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील यांची निवड झालीय.

नाशिकही हातातून गेलं

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

First published:

Tags: BJP, Sangli