'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' वाद पेटला, काँग्रेस नेत्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' वाद पेटला, काँग्रेस नेत्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे

  • Share this:

नागपूर, 12 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. आता हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी नागपूर येथील नंदनवन पोलीस ठाण्यात भावना दुखावल्याची तक्रार केली आहे.

'भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?'

तर दुसरीकडे भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लिहिलेलं 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकाचं प्रकाशित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. तसंच सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे  आणि छत्रपती उदयनराजे भोसले यांना सवाल केला आहे.

"शिवाजी महाराजांचा एकेरीत उल्लेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली, हे भाजपात शिरलेल्या छत्रपतींच्या वंशजांना मान्य आहे का?," असा प्रश्न राऊत उपस्थित केला आहे. सोबतच यावरून जोरदार राजकीय वाद सुरू झाला आहे.

तसंच, 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी  माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजप, असं म्हणत संजय राऊत यांनी सडकून टीका केली.

'माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही'

तर राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनीही भाजपवर टीका केली आहे.  'छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मियांना स्वराज्यात सामावून घेतले. शेतकऱ्यांच्या पिकालाही धक्का लागू दिला नाही, गोरगरिबांना आधार दिला. जनतेसाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही. सह्याद्री एवढ्या माझ्या राजाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा, नाहीतर गाठ महाराष्ट्राशी आहे, असा इशाराच पाटील यांनी भाजपला दिला.

'महाराष्ट्र माफ करणार नाही'

आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी पंतप्रधान मोदींची थेट तुलना करणारे पुस्तक प्रकाशित करून भाजपच्या नेत्यांनी मराठी जनाच्या भावना दुखावल्या आहेत. युगपुरुष छत्रपती शिवरायांची बरोबरी कोणीही करू शकत नाही, हा अट्टहास करू पाहणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सडकून टीका केली.

'आपली लायकी काय आहे. हे स्वतःला कळलं पाहिजे'

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आपली लायकी काय आहे. हे स्वतःला कळलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर स्वतः नकारात्मक प्रतिक्रिया दिली पाहिजे. हा शिवाजी महाराजांच्या मातीचा अपमान आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

Published by: sachin Salve
First published: January 12, 2020, 10:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading