भाजपमधील बंडखोरांचा नेत्यांवर वाढता दबाव, एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

भाजपमधील बंडखोरांचा नेत्यांवर वाढता दबाव, एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला

बंडखोरांचा दोन्ही नेत्यांवर वाढता दबाव आणि पक्षातील नाराजी नाट्यावर विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 4 डिसेंबर : भाजप नेते विनोद तावडे पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भेट घेतली आहे. एकनाथ खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी या दोन नेत्यांमध्ये बैठक झाली. बंडखोरांचा दोन्ही नेत्यांवर वाढता दबाव आणि पक्षातील नाराजी नाट्यावर विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांच्या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भेटीनंतर एकनाथ खडसे हे पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद गमावल्यानंतर भाजपमधील नाराजांनी डोकं वर काढलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते थेट माध्यमांसमोर येत फडणवीसांवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपल्या समर्थकांना सूचक संदेश दिला आहे. त्यानंतर पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातील भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते बंडाचा झेंडा हाती घेणार की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नेतृत्व दिलं होतं. भाजपचा संपूर्ण प्रचार देवेंद्र फडणवीस यांच्याभोवतीच फिरत राहिला. त्यातच मुक्ताईनगरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, बोरिवलीतून विनोद तावडे, घाटकोपरमधून प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे अशा दिग्गज नेत्यांचं तिकीट कापण्यात आलं. त्यामुळे आधीच हे नेते राज्यातील भाजप नेतृत्वावर नाराज आहेत. त्यातच पंकजा मुंडे यांच्याविषयीच्या चर्चेनंतर या नेत्यांकडूनही हालचाली होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

'रोहिनी खडसे आणि पंकजा मुंडे या पडल्या नाहीत तर त्यांना पाडण्यात आलं आहे,' असा आरोप नुकताच एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यांचा रोख माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता का, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. तर पक्ष नेतृत्व आम्हाला आगामी काळात काय जबाबदारी देतं ते पाहून निर्णय घेऊ, असं प्रकाश मेहता यांनी म्हटलं आहे.

एकनाथ खडसे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार?

'12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस...त्या दिवशी मी बोलेन तुमच्याशी मनसोक्त...जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय ...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू,' असं भावनिक आवाहन करत पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. पंकजा मुंडे यांच्या या मेळाव्याला भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हेदेखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या मेळाव्यात नाराज भाजप नेते काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published: December 4, 2019, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading